वांद्रे-मानखुर्द येथील दोन अपघातात दोन वयोवृद्धांचा मृत्यू

बाईकस्वाराला अटक तर टेम्पोचालकाचा शोध सुरु

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
25 जून 2025
मुंबई, – गेल्या दोन दिवसांत वांद्रे आणि मानखुर्द परिसरात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोन वयोवृद्धांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये सुमन यशवंत भालेराव (68) आणि अब्दुल करीम अहमद मोमीन (84) यांचा समावेश आहे. याप्रकरणी मानखुर्द आणि वांद्रे पोलिसांनी दोन स्वतंत्र अपघाताची नोंद करुन एका बाईकस्वाराला अटक केली तर अपघातानंतर पळून गेलेल्या टेम्पोचालकाचा पोलीस शोध घेत आहेत.

पहिला अपघात सोमवारी दुपारी पावणेदोन वाजता मानखुर्द टी जंक्शन, नॉर्थ बाँण्ड, वाशीकडे जाणार्‍या घाटकोपर-मानखुर्द लिंक, मंडाळा परिसरात झाला. भिमराज यशवंत भालेराव हे घाटकोपरच्या नित्यानंदनगर, सीजीएम कॉलनीत राहतात. त्यांच्यासोबत त्यांची आई सुमन, बहिण रेखा आणि भाऊ राजेश असे राहतात. ते मिलिटरीमध्ये इंजिनिअर सर्व्हिसमध्ये कामाला असून सध्या त्यांची पोस्टिंग सांताक्रुज येथील इलेक्ट्रीशियन म्हणून आहे. सोमवारी सकाळी साडेदहा वाजता त्यांची आई सुमन ही त्यांची बहिण लक्ष्मी हिच्या महाराष्ट्र नगर येथे गेली होती. दुपारी दिड वाजता ती तिच्या घरातून घाटकोपरसाठी निघाली होती.

मानखुर्द टी जंक्शन, नॉर्थ बाँण्ड, वाशीकडे जाणार्‍या घाटकोपर-मानखुर्द लिंकवरुन जाताना तिला भरवेगात जाणार्‍या एका टेम्पोने धडक दिली होती. त्यात ती गंभीररीत्या जखमी झाली होती. त्यामुळे तिला तातडीने राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. अपघाताची माहिती मिळताच मानखुर्द पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी भिमराज भालेराव यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात टेम्पोचालकाविरुद्ध हलगर्जीपणाने टेम्पो चालवून एका वयोवृद्ध महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. अपघातानंतर आरोपी चालक जखमी महिलेला कुठलीही वैद्यकीय मदत किंवा अपघाताची माहिती न देता पळून गेला होता. त्यामुळे परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

दुसरा अपघात मंगळवारी सायंकाळी सहा वाजता वांद्रे येथील रिया रेस्टॉरंटजवळ झाला. अब्दुल मोमीन हे वांद्रे येथे त्यांच्या कुटुंबियांसोबत राहत होते. मंगळवारी सायंकाळी ते वांद्रे युथील सुन्नी जामा मशिदीत नमाजासाठी जात होते. रिया रेस्ट्रॉरंटजवळ रस्ता क्रास करताना एका बाईकस्वाराने धडक दिल्याने ते गंभीररीत्या जखमी झाले होते. भाभा हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघाताला जबाबदार असलेल्या अरफात मोहम्मद समीर शेख या 19 वर्षांच्या बाईकस्वार तरुणाला नंतर पोलिसांनी ताब्यात घेतले होते. याप्रकरणी अब्दुल यांचा मुलगा मोहम्मद अश्फाक मोमीन यांच्या तक्रारीवरुन अरफात शेख याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page