मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
३० मे २०२४
मुंबई, – अंधाराचा फायदा घेऊन रात्रीच्या वेळेस अल्पवयीन मुलीवर सावत्र पित्याने लैगिंक अत्याचार केल्याची संतापजनक घटना वांद्रे परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी या मुलीच्या तक्रारीवरुन वांद्रे पोलिसांनी सावत्र पित्याविरुद्ध लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या कलमांतर्गत गुन्हा नोंदवून त्याच्यावर अटकेची कारवाई केली. अटकेनंतर त्याला विशेष सेशन कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपी पिता रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध वांद्रे आणि खार पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. दोन दिवसांपूर्वी उघडकीस आलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.
सतरा वर्षांची पिडीत मुलगी ही तिच्या आईसोबत वांद्रे परिसरात राहते. तिच्या आईने आरोपीसोबत लग्न केले होते. आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध चोरीसह अन्य गुन्ह्यांची नोंद आहे. याच गुन्ह्यांत त्याला पोलिसांनी अटक केली होती. तो जेलमध्ये होता. गेल्या वर्षी तो जेलमधून बाहेर आला होता. तेव्हापासून तो त्याच्या पत्नी आणि सावत्र मुलीसोबत राहत होता. रात्रीच्या वेळेस अंधाराचा फायदा घेऊन तो पिडीत मुलीशी अश्लील चाळे करुन तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करत होता. तिला धमकी देऊन तो तिच्यावर लैगिंक अत्याचार करत होता. जिवाच्या भीतीने तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नव्हता. अलीकडेच तिला त्रास होऊ लागला होता, हा प्रकार संशयास्पद वाटताच तिच्या आईने तिला जवळच्या क्लिनिकमध्ये नेले होते. तिथेच तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. त्यात तिच्यावर लैगिंक अत्याचार झाल्याचे उघडकीस आले होते. हा प्रकार तिच्या आईला समजताच तिने तिची विचारपूस केली होती. यावेळी तिने घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर त्या दोघींनी वांद्रे पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. मुलीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी भादवीसह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंद केला होता. गुन्हा दाखल होताच आरोपी पित्याला पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत त्याला विशेष कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी त्याला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. पिडीत मुलीची वैद्यकीय चाचणी करण्यात आली असून लवकरच आरोपीला मेडीकलसाठी पाठविले जाणार आहे असे पोलिसांकडून सांगण्यात आले.