तरुणीचा विनयभंग करुन पोलिसांना मारहाण करुन दुखापत
विनयभंगासह सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२५ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – गार्डनमध्ये आलेल्या एका २६ वर्षांच्या तरुणीचा विनयभंग करुन तिचे व्हिडीओ बनवून ते सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देणार्या आरोपीवर कारवाई करण्यासाठी दोन पोलिसांना मारहाण करुन दुखापत करण्यात आल्याचा प्रकार वांद्रे परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी बाबर रेहमत खान या ३४ वर्षांच्या सुरक्षारक्षकाला वांद्रे पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध विनयभंागसह सरकारी कामात अडथळा आणून कर्तव्य बजाविणार्या दोन पोलिसांना मारहाण करुन दुखापत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही घटना शनिवारी रात्री आठ वाजता वांद्रे येथील रिक्लमेशन गार्डनमध्ये घडली. २६ वर्षांची तक्रारदार तरुणी ही सांताक्रुज येथे राहत असून तिचा स्वतचा व्यवसाय आहे. शनिवारी रात्री आठ वाजता ती तिच्या मैत्रिणीसोबत रिक्लमेशन गार्डनमध्ये आली होती. यावेळी बाबर खान या सुरक्षारक्षकाने तिला अश्लील शिवीगाळ करुन तिच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला होता. तसेच तिचा पाठलाग करुन मोबाईलवरुन व्हिडीओ बनवून ते सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी दिली होती. क्षुल्लक वादातून तिच्याशी अश्लील वर्तन करुन तिचा विनयभंग केला होता. हा प्रकार तिथे गस्त घालणार्या पोलीस हवालदार सुंडकर आणि पोलीस शिपाई गोराडे यांच्या लक्षात येताच त्यांनी त्याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले होते. यावेळी त्याने पोलिसांशी हुज्जत घालून त्यांना शिवीगाळ केली. त्यांना मारहाण करुन दुखापत केली तसेच त्यांच्या सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला.
या मारहाणीत या दोघांनाही किरकोळ दुखापत झाली होती. या घटनेनंतर या तरुणीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी बाबर खानविरुद्ध विनयभंगासह सरकारी कामात अडथळा आणणे तसेच अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर रविवारी दुपारी त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.