मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१ जानेवारी २०२५
मुंबई, – क्लाससाठी जाणार्या एका सोळा वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा तिच्याच शेजारी राहणार्या एका ६१ वर्षांच्या वयोवृद्धाने विनयभंग केल्याची घटना मंगळवारी वांद्रे परिसरात घडली. याप्रकरणी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच आरोपी वयोवृद्धाला वांद्रे पोलिसांनी अटक केली. बळीत मुलीला पाहून स्वत पॅण्ट काढून त्याने अश्लील चाळे करुन तिला इशार्याने बोलावून तिचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. बळीत आणि आरोपी एकाच सोसायटीमध्ये शेजारी राहत असल्याने या प्रकाराने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.
४३ वर्षांची तक्रारदार महिला ही वांद्रे येथे राहते. सोळा वर्षांची बळीत तिची मुलगी असून ती सध्या शिक्षण घेते. आरोपी वयोवृद्ध तिच्या शेजारीच राहत असल्याने ते एकमेकांच्या परिचित आहेत. मंगळवारी सकाळी साडेसहा वाजता तिची मुलगी क्लासला जात होती. यावेळी तिच्या राहत्या सोसायटीच्या आवारात आरोपीने स्वतची पॅण्ट काढून तिचा पाहून अश्लील कृत्य केले होते. तिच्याकडे अश्लील इशारे करुन जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तिने त्याकडे दुर्लक्ष केले आणि ती क्लाससाठी निघून गेली होती. दुपारी एक वाजता ती क्लासमधून घरी जात असातना त्याने तिचा पुन्हा पाठलाग केला. तिला तोंडाने इशारे करुन बोलवण्याचा प्रयत्न केला होता. घडलेला प्रकार तिने तिच्या आईला सांगितला. त्यानंतर तिने मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला ही माहिती सांगून पोलीस मदतीची विनंती केली होती.
ही माहिती कंट्रोल रुममधून प्राप्त होताच वांद्रे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी तक्रारदार महिलेसह बळीत मुलीची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी ६१ वर्षांच्या वयोवृद्धाविरुद्ध विनयभंगासह पोक्सोच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर आरोपीला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला विशेष पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते.