मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
6 एप्रिल 2025
मुंबई, – वांद्रे येथील जॉगर्स पार्कमध्ये गेलेल्या अकरा व तेरा वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सुरज नावाच्या एका 20 वर्षांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला खेरवाडी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून याच गुन्ह्यांत त्याला पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. सुरजविरुद्ध खेरवाडी पोलीस ठाण्यात रॉबरीसह घातक शस्त्रे बाळगणे, गंभीर दुखापतीसह शिवीगाळ करुन जिवे मारणयाची धमकी दिल्याप्रकरणी अकरा, बीकेसी पोलीस ठाण्यात रॉबरीसह चोरीचे दोन, निर्मलनगर आणि खार पोलीस ठाण्यात चोरीसह रॉबरीचे दोन अशा पंधराहून अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले.
62 वर्षांची वयोवृद्ध महिला वांद्रे येथे राहत असून घरकाम करते. शुक्रवारी 4 एप्रिलला रात्री साडेआठ वाजता ती तिची अकरा वर्षांची नात आणि तेरा वर्षांची मैत्रिणीसोबत वांद्रे येथील जॉगर्स पार्कमध्ये गेली होती. यावेळी तिथे सुरज आला आणि त्याने या दोन्ही मुलींशी जवळीक साधून अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला. त्यांचे हात पकडून त्यांच्या कमरेला नकोसा स्पर्श करुन दोन्ही अल्पवयीन मुलींचा विनयभंग केला होता. या दोघींकडून हा प्रकार तिच्या आजीला समजताच तिने खेरवाडी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या सुरजला पोलिसांनी अटक केली.
सुरज हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध खेरवाडी, बीकेसी, निर्मलनगर आणि खार पोलीस ठाण्यात पंधराहनू अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. यातील काही गुन्ह्यांत त्याच्यावर अटकेची कारवाई झाली होती. याच गुन्ह्यांत तो सध्या जामिनावर बाहेर आला होता. विनयभंगासह पोक्सोच्या गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला रविवारी पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.