मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
22 जुलै 2025
मुंबई, – चालत्या रिक्षात एका सोळा वर्षांच्या अल्पवयीन तरुणीचा एका अज्ञात व्यक्तीने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना वांद्रे परिसरात घडली. यावेळेस या व्यक्तीने तरुणीने रिक्षाचालकाला चाकूचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी विनयभंगासह धमकी देणे आणि पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच आरोपीस काही तासांत वांद्रे पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत त्याला मंगळवारी विशेष पोक्सो कोर्टात हजर केले जाणार आहे.
बळीत मुलगी ही वांद्रे येथे तिच्या कुटुंबियांसोबत राहते. ती सध्या एका नामांकित कॉलेजमध्ये शिक्षण घेते. सोमवारी दुपारी बारा वाजता ती घरातून कॉलेजला जाण्यासाठी निघाली होती. रिक्षातून प्रवास करताना ही रिक्षा वांद्रे येथील एस. व्ही रोड, बोस्टन हॉटेलच्या सिग्नलजवळ थांबली होती. याच दरम्यान रिक्षात एक अज्ञात व्यक्तीने प्रवेश केला. त्याला काही अंतर पुढे जायचे आहे, रिक्षा मिळत नसल्याने तो रिक्षात बसल्याचे सांगू लागला. यावेळी त्याने तिच्याशी अश्लील संभाषण करुन जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न केला. रिक्षातच त्याने तिचा विनयभंग केला होता.
या प्रकारानंतर रिक्षाचालकाने त्याला खाली उतरण्यास सांगितले असता त्याने त्याच्याकडील चाकूने तरुणीसह रिक्षाचालकाला जिवे मारण्याची धमकी दिली होती. पुढच्या सिग्नल रिक्षा थांबताच तो रिक्षातून उतरुन पळून गेला होता. या घटनेने ही तरुणी प्रचंड घाबरली. तिने कॉलेजमध्ये न जाता घरी जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर रिक्षाचालकाने तिला तिच्या घरी सोडले होते. घरी आल्यानंतर तिने घडलेला प्रकार तिच्या पालकांना सांगितला. त्यानंतर त्यांनी वांद्रे पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. तिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय सहिताआणि पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत आरोपीच्या अटकेचे स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेला आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतले होते. या फुटेजसह तांत्रिक माहितीवरुन रात्री उशिरा एका 22 वर्षीय तरुणाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यानेच हा गुन्हा केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर त्याला पोलिसांनी अटक केली. सोमवारी दुपारी भरस्त्यात घडलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये विशेषता महिला वर्गात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.