मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
4 मे 2025
मुंबई, – दर्ग्याच्या मालकी हक्कावरुन शाकीरअली शेख या 46 वर्षांच्या हत्येनंतर पळून गेलेल्या एका वॉण्टेड महिलेसह अल्पवयीन मुलाला शनिवारी वांद्रे पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. परवीन जाकीरअली शेख असे या महिलेचे नाव असून अटकेनंतर तिला वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. याच गुन्ह्यांत ताब्यात घेतलेला मुलगा अल्पवयीन असल्याने त्याला डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे. याच गुन्ह्यांत यापूर्वी इम्रान नासीर शेख, उस्मानअली ऊर्फ फारुख जाकीरअली शेख, जाकीर अली शेख आणि फातिमा ऊर्फ कायनात इम्रान खान या चौघांना पोलिसांनी अटक केली होती. आता परवीनसह अल्पवयीन मुलाच्या अटकेने या गुन्ह्यांत अटक केलेल्या आरोपींची संख्या सहा झाली आहे.
वांद्रे येथील बडी मशिदीजवळील मौलाना बाबा सुफी सुल्तान नक्सबंदी दर्ग्याजवळ अफजलअली आझमअली शेख हा 27 वर्षांचा तरुण त्याच्या कुटुंबियंसोबत राहतो. याच परिसरातील दर्ग्याच्या मालकी हक्कावरुन शेख आणि खान कुटुंबियांमध्ये गेल्या काही वर्षांपासून वाद सुरु होता. याच वादातून त्यांच्यात नेहमीच खटके उडत होते. 11 एप्रिलला रात्री साडेआठ वाजता या दोन्ही कुटुंबियांमध्ये पुन्हा वाद झाला होता. यावेळी रागाच्या भरात एका गटाने दुसर्या गटातील अफजलअलीचे चुलते शाकीर अली शेख यांना शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली होती. या धमकीनंतर त्यांच्यातील वाद विकोपास गेले होते. त्यातून या आरोपींनी शाकीरअली यांच्यावर चाकूने वार केले होते.
हल्ल्यादरम्यान अफजलअलीची आई नूरजहाँ अजमाली शेख ऊर्फ शिरीन आणि नातेवाईक खिजारअली अन्वर अली संडोले ऊर्फ मोनू यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे या चौघांनी त्यांच्यावरही तिक्ष्ण हत्याराने वार केले होते. त्यात शाकीरअली, नूरजहाँ आणि खिजारअली हे तिघेही गंभीररीत्या जखमी झाले होते. जखमी तिघांनाही स्थानिक रहिवाशांनी तातडीने कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे शाकीरअली यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले तर नूरजहाँ यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले होते. ही माहिती प्राप्त होताच वांद्रे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी अफजलअलीच्या जबानीवरुन पोलिसांनी संंबंधित आरोपीविरुद्ध हत्येसह हत्येचा प्रयत्न आणि अन्य भारतीय न्याय सहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या इम्रान खान, उस्मानअली शेख, जाकीरअली शेख आणि फातिमा खान अशा चारही आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. याच गुन्ह्यांत ते चौघेही सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. या हत्येनंतर परवीनसह आरोपी मुलगा पळून गेले होते. त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु होता. ही शोधमोहीम सुरु असताना परवीन शेखसह अल्पवयीन मुलाला शनिवारी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर परवीनला रविवारी दुपारी वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने तिला पोलीस कोठडी सुनावली आहे तर आरोपी मुलाला डोंगरी बालसुधारगृहात पाठविले होते.