रॉबरीच्या उद्देशाने ६४ वर्षांच्या वयोवृद्ध महिलेची हत्या

गुन्हा दाखल होताच दोन तासांत मुख्य आरोपीस अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
११ फेब्रुवारी २०२५
मुंबई, – रॉबरीच्या उद्देशात फ्लॅटमध्ये प्रवेश करुन रेखा अशोक खोंडे या ६४ वर्षांच्या वयोवृद्ध महिलेची तिच्याच परिचित तरुणाने गळा आवळून आणि नंतर तिक्ष्ण हत्याराने वार करुन हत्या केली होती. याप्रकरणी रॉबरीसह हत्येचा गुन्हा दाखल होताच अवघ्या दोन तासांत मुख्य आरोपीस अटक करुन वांद्रे पोलिसांनी या गुन्ह्यांचा पर्दाफाश केला. शरीफअली समशेरअली शेख असे २७ वर्षीय आरोपीचे नाव असून याच गुन्ह्यांत त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही घटना ५ फेब्रुवारी वांद्रे येथील एचआयडी कॉलनी रिक्लेमेशन डेपो गेट क्रमांक दोन, कांचन सहकारी सोसायटीमध्ये घडली. याच सोसायटीच्या दुसर्‍या मजल्यावरील रुम क्रमांक रेखा ही खोंडे ही महिला एकटीच राहते. तिची एक मुलगी असून ती मालाड येथील एका खाजगी कंपनीत कामाला आहे. याच परिसरातील एका महिला वसतिगृहात ती राहत असून अधूनमधून तिच्या आईला भेटण्यासाठी येत होती. सोमवारी रात्री उशिरा रेखा यांच्या फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याचे काही स्थानिक रहिवाशांच्या लक्षात आले होते. हा प्रकार संशयास्पद वाटताच या रहिवाशांनी वांद्रे पोलिसांना ही माहिती दिली होती. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. फ्लॅटमध्ये प्रवेश केल्यानंतर पोलिसांना रेखा यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला होता. त्यामुळे त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. प्राथमिक तपासात रेखा यांची ओढणीने गळा आवळून आणि नंतर गळ्यावर तिक्ष्ण हत्याराने वार करुन हत्या करण्यात आल्याचे उघडकीस आले होते. हा प्रकार उघडकीस येताच वांद्रे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता.

एका वयोवृद्ध महिलेची तिच्या राहत्या घरी झालेल्या हत्येच्या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत वांद्रे पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त परमजीतसिंग दहिया, पोलीस उपायुक्त दिक्षीत गेडाम, सहाय्यक पोलीस आयुक्त अधिकराव पोळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मराठे यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक बालाजी भांगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय आचरेकर, बजरंग जगताप, सांताक्रुज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार सावंत, आंबोली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक फुंदे व अन्य पोलीस पथकाने आरोपीचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतले होते. यातील एका फुटेजमध्ये शरीअली शेख हा दिसून आला होता. तो रेखा यांचा परिचित होता. त्यांच्या घरी त्याचे येणे-जाणे होते. त्यामुळे त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. सुरुवातीला त्याने त्याचा या हत्येशी काहीही संबंध नसल्याचे सांगून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.

मात्र पोलिसी इंगा दाखविताच त्यानेच रेखा खोंडे यांची हत्या केल्याची कबुली दिली. रेखा या एकट्याच राहत होत्या. त्यामुळे त्याने त्यांच्या घरी रॉबरीची योजना बनविली होती. ५ फेब्रुवारीला तो तिच्या घरी गेला होता. त्याने रॉबरीच्या उद्देशाने रेखा यांची गळा आवळून आणि नंतर तिक्ष्ण हत्याराने वार करुन हत्या केली. त्यानंतर तिच्या घरातील सोन्याच्या दागिन्यांसह कॅश घेऊन तो पळून गेला होता. त्याच्या कबुलीनंतर त्याला पोलिसांनी हत्येसह रॉबरीच्या गुन्ह्यांत अटक केली. अटकेनंतर त्याला मंगळवारी दुपारी वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. रॉबरीसह हत्येचा गुन्हा दाखल होताच अवघ्या दोन तासांत कुठलाही पुरावा नसताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मराठे यांच्या पथकाने या गुन्ह्यांचा पर्दाफाश करुन आरोपीला अटक केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page