मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
11 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – सिमकार्डच्या वादातून एका शिवजी बनारस सिंग नावाच्या एका 62 वर्षांच्या वयोवृद्धाची त्याच्याच रुममेटची गळा आवळून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल होताच आरोपी रुममेट संजीवकुमार भांडमतश्वर यादव याला वांद्रे पोलिसांनी अटक केली आहे. मयत आणि आरोपी बिहारचे रहिवाशी असून एकाच रुममध्ये राहत असल्याचे पोलिसांनी सांगितले. याच गुन्ह्यांत त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टाने सोमवार 13 ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही घटना गुरुवारी दुपारी तीन ते सायंकाळी पाचच्या सुमारास वांद्रे येथील मेहबूब स्टुडिओजवळील सार्वजनिक शौचालयाच्या पहिल्या मजल्यावरील रुममध्ये घडली. शिवजी सिंग हा मूळचा बिहारच्या वैशालीनगरचा रहिवाशी आहे. सध्या तो वांद्रे येथील मेहबूब स्टुडिओजवळील एका सार्वजनिक शौचालयात केअरटेकर म्हणून काम करत होता. दिवसभर काम करुन तो पहिल्या मजल्यावरील रुममध्ये राहत होता. त्याच्याच रुममध्ये संजीवकुमार हा राहत होता. तो डिलीव्हरी बॉयसह एका रुग्णाकडे केअरटेकर म्हणून काम ंकरत होता. ते दोघेही मूळचे बिहारचे रहिवाशी असल्याने त्यांची चांगली मैत्री झाली होती.
दोन दिवसांपूर्वी त्यांच्यात सिमकार्डवरुन भांडण झाले होते. शिवजीला संजीवकुमारने त्याचा सिमकार्ड चोरी केल्याचा संशय होता. मात्र तो सिमकार्ड चोरी केली नाही असे सांगत होता. त्यामुळे त्याने त्याला घराबाहेर जाण्यास सांगितले. याच कारणावरुन झालेल्या भांडणाचे पर्यावसान शाब्दिक बाचाबाची आणि नंतर हाणीमारीत झाले होते. रागाच्या भरात त्याने शिवजी यांची गळा आवळून हत्या केली होती. या हत्येनंतर तो तेथून पळून गेला होता. भीतीपोटी त्याने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही.
दुसर्या दिवशी त्याने शौचालयाच्या व्यवस्थापकाला शिवजी हा रुममध्ये बेशुद्धावस्थेत पडल्याचे सांगितेले. त्यामुळे तो तिथे गेला होता. त्याला शिवजी हा बेशुद्धावस्थेत पडल्याचे दिसून आले. त्याच्या मानेवर खुणा होत्या. कानातून रक्त येत होते. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्याने ही माहिती वांद्रे पोलिसांना दिली. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन शिवजी सिंगला तातडीने वांद्रे येथील भाभा हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.
शवविच्छेदन अहवालात त्याची गळा आवळून हत्या झाल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून शिवजीचा रुममेट संजीवकुमारला ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यानेच सिमकार्डच्या वादातून ही हत्या केल्याची कबुली दिली. घटनेच्या वेळेस ते दोघेच रुममध्ये होते. शिवजीच्या हत्येनंतर तो घाबरला आणि पळून गेला होता. मात्र हत्येचा गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. शनिवारी दुपारी त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.