वांद्रे येथे 26 वर्षांच्या सुरक्षारक्षकाची चाकूने वार करुन हत्या

ओळख पटल्याने मारेकर्‍याच्या अटकेसाठी विशेष मोहीम

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
13 एप्रिल 2026
मुंबई, – सुरक्षारक्षक म्हणून काम करणार्‍या अभिनवकुमार चौधरी या 26 वर्षांच्या तरुणाची त्याच्याच परिचित मारेकर्‍याने चाकूने वार करुन हत्या केल्याची घटना वांद्रे परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी खेरवाडी पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. मारेकर्‍याची ओळख पटली असून त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. दरम्यान या हत्येमागील कारणाचा खुलासा होऊ शकला नाही. पूर्ववैमस्नातून किंवा आर्थिक वादातून ही हत्या झाली असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

ही घटना सोमवारी दुपारी दोन वाजता वांद्रे येथील खेरवाडी, म्हाडा कार्यालयासमोर घडली. अभिनवकुमार हा मूळचा बिहारच्या दरभंगाचा रहिवाशी असून गेल्या काही वर्षांपासून तो मुंबई शहरात वास्तव्यास होता. मुंबईत सध्या तो एका खाजगी कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता. सोमवारी दुपारी दोन वाजता तो म्हाडा कार्यालयासमोर होता. यावेळी त्याच्या परिचित आरोपीने त्याच्याशी वाद घालून त्याच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केला होता. त्यात त्याच्या मानेला आणि हाताला गंभीर दुखापत झाली होती. हल्ल्यानंतर मारेकरी तेथून पळून गेला होता.

स्थानिक रहिवाशांकडून ही माहिती प्राप्त होताच खेरवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी झालेल्या अभिनवकुमारला तातडीने जवळच्या भाभा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. याप्रकरणी खेरवाडी पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोेंदवून तपास सुरु केला आहे. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यातील एका फुटेजमध्ये मारेकर्‍याची ओळख पटली आहे.

तो सांताक्रुज येथील वाकोला परिसरात राहतो. अभिनव आणि मारेकरी एकमेकांच्या परिचित असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या हत्येमागील कारण समजू शकले नाही. मारेकर्‍याच्या अटकेनंतर हत्येमागील कारणाचा खुलासा होईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले. दरम्यान सोमवारी भरस्त्यात घडलेल्या या हत्येच्या घटनेने परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page