मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
27 नोव्हेंबर 2025
मुंबई, – कौटुंबिक वादातून रागाच्या भरात पत्नीची तिक्ष्ण हत्याराने हत्या करुन आरोपी पतीने स्वत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना वांद्रे परिसरात घडली. नजमा ऊर्फ नाजो नवाब वार्शी असे या 35 वर्षीय महिलेचे नाव असून तिच्या पती नाव नवाब वार्शी असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक खराडे यांनी सांगितले. याप्रकरणी निर्मलनगर पोलिसांनी हत्येसह एडीआरची नोंद करुन तपास सुरु केला आहे. या दोघांचे मृतदेह सायन हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले असून शवविच्छेदनानंतर त्यांचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांना सोपविण्यात येणार आहे.
ही घटना गुरुवारी सकाळी वांद्रे येथील बेहरामनगर, गेट क्रमांक अठरा, केकवाली गल्लीत घडली. याच परिसरात नवाब हा त्याची पत्नी नजमासोबत राहत होता. या दोघांचा दुसरा विवाह होता. एक वर्षांपूर्वी त्यांनी लग्न केले होते. नवाज हा अधूनमधून रिक्षा चालवत होता. त्याला नशा करण्याचे व्यसन होते. अनेकदा तो कामावर न जाता घरीच राहत होता. काहीच कामधंदा करत नसल्याने त्याचे त्याच्या पत्नीशी सतत खटके उडत होते. घरखर्चासाठी तो पैसे देत नसल्याने त्यांच्या पंधरा दिवसांपासून वाद सुरु होता.
या वादानंतर नजमा ही तिच्या माहेरी निघून गेली होती. त्यामुळे त्याने तिला पुन्हा घरी येण्याची विनंती केली होती. त्याने तिला घरी न राहता रिक्षा चालविण्याचे तसेच घरखर्चासाठी पैसे देण्याचे आश्वासन दिले होते. तसेच यापुढे नशा करणार नाही असे सांगितले होते. त्यामुळे नजमा ही सकाळीच तिच्या घरी आली होती. मात्र घरी आल्यानंतर त्यांच्यात पुन्हा कौटुंबिक वाद झाला होता. याच वादातून रागाच्या भरात त्याने तिची तिक्ष्ण हत्याराने वार केली होती. त्यानंतर त्याने घरातच आत्महत्या केली होती.
सायंकाळी नजमाची आई तिच्याकडे आली होती. तिने दरवाजा ठोठावला, मात्र आतून कोणीही प्रतिसाद दिला नाही. हा प्रकार संशयास्पद वाटताच तिने निर्मलनगर पोलिसांना ही माहिती दिली होती. या घटनेनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश वाघ, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक खराडे व अन्य पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी अग्निशमन दलाने दरवाजा तोडून आत प्रवेश केला होता. यावेळी ते दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. त्यामुळे नजमासह नवाबला पोलिसांनी तातडीने सायन हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे या दोघांनाही डॉक्टरांनी मृत घोषित केले.
प्राथमिक तपासात कौटुंबिक वादातून नवाबने नजमाची तिक्ष्ण हत्याराने हत्या करुन नंतर त्याने स्वत आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी नवाबविरुद्ध निर्मलनगर पोलिसांनी हत्येसह आत्महत्या केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. या दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे. शवविच्छेनानंत त्यांचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांना सोपविण्यात येणार आहे. गुरुवारी उघडकीस आलेल्या या हत्येसह आत्महत्येच्या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये एकच खळबळ उडाली होती. या गुन्ह्यांचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक खराडे करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.