मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
३१ जुलै २०२४
मुंबई, – अश्लील मॅसेज पाठवून एका कलाकार तरुणीचा विनयभंगाचा झाल्याचा प्रकार वांद्रे परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी या तरुणीच्या तक्रारीवरुन वांद्रे पोलिसांनी विनयभंगासह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून या अज्ञात व्यक्तीचा शोध सुरु केला आहे. या गुन्ह्यांचा संमातर तपास सायबर सेलचे अधिकारी करत आहेत.
२८ वर्षांची तक्रारदार तरुणी ही वांद्रे येथे राहत असून तिचे आई-वडिल नवी मुंबईतील खारघर परिसरात राहतात. ती स्टॅण्डअप कॉमेडियन म्हणून कार्यक्रम करत असून त्यातून तिचा उदरनिर्वाह चालतो. तिचे इंटाग्रामवर अकाऊंट असून तिचे साडेचार लाख फॉलोवर्स आहेत. दोन वर्षांपूर्वी तिला एका अज्ञात व्यक्तीकडून रिक्वेस्ट आली होती. तिला अशा प्रकारे अनेकांचे रिक्वेस्ट येत असल्याने तिने त्याकडे दुर्लक्ष केले होते. तरीही संबंधित व्यक्ती तिला सतत फॉलो करत होता. दोन महिन्यांपूर्वी तिच्या वडिलांनी त्यांना एका अज्ञात व्यक्तीकडून सतत मॅसेज येत असल्याचे सांगितले होते. याच दरम्यान त्यांच्या नवी मुंबईतील राहत्या घरी ऍमेझॉनमधून एक पार्सल आले होते. त्यात एक पर्स होती. या पर्सविषयी त्यांनी तिच्याकडे विचारणा केली होती. मात्र तिने कुठलेही पर्सची ऑर्डर दिली नसल्याचे सांगितले. त्यानंतर तिने तिच्या वडिलांकडून ईमेलचे ऍक्सेस घेतले होते. त्यात तिला अज्ञात व्यक्तीने अश्लील संभाषण केलेले मॅसेज पाठविल्याचे दिसून आले. या घटनेनंतर तिने घडलेला प्रकार वांद्रे पोलिसांना सांगून तिथे अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी विनयभंगासह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. या गुन्ह्यांचा सायबर सेलचे अधिकारी तपास करत आहेत.