लायसन्स विचारले म्हणून भरस्त्यात पोलीस शिपायाला मारहाण
२४ वर्षांच्या भंगार विक्रेत्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१४ फेब्रुवारी २०२५
मुंबई, – लायसन्स विचारले म्हणून अमोल जयवंत नावाडकर या पोलीस शिपायाला भरस्त्यात शिवीगाळ करुन कानशिलात लगावून त्यांचा शर्ट फाडून सरकारी कामात अडथळा आणण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार वांद्रे परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी सैफ रईस खान या २४ वर्षांच्या भंगार विक्रेत्या तरुणाविरुद्ध वांद्रे पोलिसांनी भारतीय न्याय सहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्याला ३५ (३) अन्वये नोटीस देऊन सोडून देण्यात आले. भरस्त्यात पोलीस शिपायावर झालेल्या मारहाणीमुळे पोलिसांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.
अमोल जयवंत नावाडकर हे माहीम पोलीस वसाहतीत राहत असून सध्या वांद्रे पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहेत. गुुरुवारी सायंकाळी सहा वाजता ते खेरवाडीकडून माहीम कॉजवेकडे जाणार्या रस्त्यावर नाकाबंदी करत होते. सायंकाळी साडेसात वाजता बाईक्वरुन दोन तरुण जात होते. यावेळी त्यांनी बाईकस्वाराला थांबवून त्याच्याकडे लायसन्सची मागणी केली होती. त्याचा राग आल्याने बाईकच्या मागे बसलेल्या सैफने त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तुझ्याकडे फाईनसाठी लागणारी मशिन आहे का अशी विचारणा करुन त्यांचे कपडे ओढत त्यांचा शर्ट फाडून त्यांच्या गालावर जोरात चापट मारली. त्यांनी त्याला थांबविण्याचा तसेच शांत राहण्यास सांगूनही तो त्यांच्या उद्धट वर्तन करुन त्यांच्या सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करत होता.
हा प्रकार समजताच वांद्रे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी पोलिसांनी अमोल नावाडकर यांना शिवीगाळ करुन मारहाण करणार्या तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणणे, कर्तव्य बजाविणार्या पोलीस शिपायाला शिवीगाळ करुन मारहण करणे तसेच अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. सैफ हा वांद्रे येथील ज्ञानेश्वर भारतनगर, टायटॉनिक इमारतीमध्ये राहतो. याच गुन्ह्यांत त्याला नोटीस देऊन सोडून देण्यात आले होते. लायसन्स विचारले म्हणून हा प्रकार घडल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.