अश्लील फोटोसह व्हिडीओ मैत्रिणीला पाठवून बदनामीचा प्रयत्न
तरुणीच्या तक्रारीवरुन माजी प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
23 एप्रिल 2025
मुंबई, – शारीरिक संबंधाचे खाजगी अश्लील फोटोसह व्हिडीओ मैत्रिणीला पाठवून एका तरुणीची तिच्याच माजी प्रियकराने बदनामी केल्याचा प्रकार वांद्रे परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी शिवा राजेंद्र बडोला या 29 वर्षीय प्रियकराविरुद्ध वांद्रे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शिवा हा मूळचा उत्तरप्रदेशचा रहिवाशी असून त्याच्या अटकेसाठी एक टिम लवकरच उत्तरप्रदेशला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
27 वर्षांची तक्रारदार तरुणी ही खार येथे राहते असून ती सध्या मिडीया कन्सल्टींगचे काम करते. पूर्वी ती तिच्या एका मित्रासोबत वांद्रे येथील टू बीएचके फ्लॅटमध्ये भाड्याने राहत होती. जानेवारी 2024 रोजी तिची शिवा या तरुणाशी गोवा येथे भेट झाली होती. शिवा हा मूळचा उत्तरप्रदेशचा रहिवाशी आहे. ओळखीनंतर ते दोघेही चांगले मित्र झाले होते. त्यानंतर ते दोघेही एकमेकांना डेट करत होते. 30 डिसेंबर 2024 रोजी शिवा हा मुंबईत आला होता. यावेळी तो तिच्या वांद्रे येथील फ्लॅटमध्ये आला होता. तिथेच त्यांच्यात दोघांच्या संमतीने शारीरिक संबंध आले होते. यावेळी शिवाने त्यांच्यातील शारीरिक संबंधाचे मोबाईलवरुन तिच्या नकळत काही फोटो आणि व्हिडीओ काढले होते. याबाबत तिला काहीच माहिती नव्हती.
काही दिवसांनी त्यांच्यात क्षुल्लक कारणावरुन वाद होऊ लागले. याच दरम्यान तिला शिवाचे इतर तरुणीसोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती समजली होती. त्यामुळे तिने त्याला जाब विचारला होता. यावेळी त्यांच्यात प्रचंड वाद होऊन त्याने तिला मारहाण केली होती. या घटनेनंतर तिने त्याच्याशी असलेले संबंध तोडून टाकले होते. त्याचा मोबाईल ब्लॉक केला होता. 9 एप्रिलला तिची मैत्रिण तिच्या घरी आली होती. यावेळी तिने शिवा तिच्यासोबत डेटींग अॅपवर चॅट करत आहे. त्यांच्यातील शारीरिक संबंधाचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ त्याने तिला पाठविल्याचे सांगितले. हा प्रकार समजताच तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता.
शारीरिक संबंधाचे पर्सनल अश्लील फोटो आणि व्हिडीओ मैत्रिणीला पाठवून शिवाने तिची बदनामीचा प्रयत्न केला होता. त्यामुळे तिने शिवाला कॉल करुन याबाबत विचारणा केली असता त्याने तिला शिवीगाळ केली होती. घडलेल्या प्रकारानंतर तिने वांद्रे पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगून शिवाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत आरोपी माजी प्रियकराविरुद्ध भारतीय न्याय सहितेसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत शिवाला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. आरोपीच्या अटकेसाठी वांद्रे पोलिसांची एक टिम लवकरच उत्तरप्रदेशला जाणार आहे.