मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
19 सप्टेंबर 2025
मुंबई, – मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे उल्लघंन करुन कबुतरांना खाऊ दिल्याप्रकरणी एका महिलेसह चौघांविरुद्ध वांद्रे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. महिलेची ओळख पटली नाही, मात्र इतर तिघांमध्ये मेहताब अहमद शेख, निखील हरिनाथ सरोज, सलम दुर्गेश कुमार यांचा समावेश आहे. गुन्हा दाखल होताच या तिघांना नोटीस देऊन सोडून देण्यात आले. कबुतरांना खाऊ देणे या तरुणांना चांगलेच महागात पडले आहे.
योगेश जयसिंग फाळके हे घाटकोपर येथे राहत असून वांद्रे येथील मनपा कार्यालयात सहाय्यक उपद्रव शोधक पदावर काम करतात. गुरुवारी सकाळी अकरा वाजता ते त्यांचे सहकाररी विजय यादव, निलेश जाधव यांच्यासोबत वांद्रे येथील तलावाजवळ गस्त घालत होते. यावेळी तिथे काही तरुण कबुतरांना खाऊ घालत असल्याचे दिसून आले. मुबई उच्च न्यायालयाने कबुतरांना खाऊ देण्यास मनाई केली असता ते तिघेही तिथे कबुतरांना खाद्यपदार्थ देत होते.
याच दरम्यान तिथे एक महिला बाईकवरुन आली होती. तिनेही कबुतरांना खाद्यपदार्थ देण्यास सुरुवात केली होती. यावेळी या कर्मचार्यांनी त्यांना मुंबई उच्च न्यायलयाने दिलेल्या आदेशाचा बोर्ड दाखविला होता. मात्र त्याकडे दुर्लक्ष करुन त्यांनी कबुतरांना खाऊ देणे सुरुच ठेवले होते तर ती महिला बाईकवरुन निघून गेली होती. याच दरम्यान तिथे वांद्रे पोलिसांचे एक विशेष पथक आले होते. या पथकाने कबतुरांना खाऊ देणार्या तिन्ही तरुणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
चौकशीत त्यांचे नाव मेहतबा शेख, निखिल सरोज आणि सलम कुमार असल्याचे उघडकीस आले. ते तिघेही वांद्रे परिसरातील रहिवाशी आहे. याप्रकरणी योगेश फाळके यांच्या तक्रारीवरुन वांद्रे पोलिसांनी तिन्ही तरुणासह अज्ञात महिलेविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे उल्लघंन करुन कबुतरांना खाद्यपदार्थ दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत या तिघांनाही नोटीस देऊन सोडून देण्यात आले.