मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
६ ऑगस्ट २०२४
मुंबई, – आठ वर्षांच्या अल्पवयीन मुलाला जिवे मारण्याची धमकी देऊन त्याच्याच सहकारी दोन अल्पवयीन मित्रांनी अश्लील चाळे करण्यास प्रवृत्त केल्याचा धक्कादायक घटना वांद्रे परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी मुलाच्या आईच्या तक्रारीवरुन वांद्रे पोलिसांनी गुन्हा दाखल करुन चौदा आणि सोळा वयोगटातील दोन्ही अल्पवयीन मुलांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. या दोघांनाही डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे.
तक्रारदार महिला ही वांद्रे येथे तिच्या कुटुंबियांसोबत राहत असून तिला आठ वर्षांचा मुलगा आहे. दोन्ही आरोपी मुले याच परिसरात राहत असून पिडीत मुलासह ते दोघेही चांगले मित्र आहेत. शनिवारी सायंकाळी सात वाजता पिडीत मुलाला दोन्ही मुलांनी एका नाल्याजवळ आणले होते. तिथे त्याला धमकी देऊन त्याने त्यांच्यासोबत अश्लील चाळे करण्यास प्रवृत्त केले होते. त्याने नकार देताच त्यांनी त्याला नाल्यात फेंकून देण्याची धमकी दिली होती. त्यानंतर त्यांनी त्याच्याशी अश्लील चाळे करुन त्याच्यावर लैगिंक अत्याचार केला होता. घरी आल्यानंतर या मुलाने घडलेला प्रकार त्याच्या आईला सांगितला. ही माहिती ऐकून तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यानंतर तिने वांद्रे पोलीस ठाण्यात जाऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगून दोन्ही अल्पवयीन मुलांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी ३५१ (२) भारतीय न्याय सहिता सहकलम ४, ८, १२ पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच चौदा आणि सोळा वर्षांच्या या दोन्ही मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले होते. सोमवारी उघडकीस आलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती. पिडीत मुलाची कूपर हॉस्पिटलमध्ये मेडीकल करण्यात आली असून त्याचा अहवाल लवकरच पोलिसांना प्राप्त होणार आहे.