हरिद्वार येथून आलेल्या ५५ वर्षांच्या महिलेवर अत्याचार
वांद्रे टर्मिनस स्थानकात घडलेल्या प्रकाराने संतापाची लाट
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२ फेब्रुवारी २०२५
मुंबई, – हरिद्वार येथून मुंबईत आलेल्या एका ५५ वर्षांच्या महिलेवर अज्ञात व्यक्तीने लैगिंक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना वांद्रे टर्मिनस रेल्वे स्थनकात घडल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी लैगिंक अत्याचाराचा गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या आरोपीस वांद्रे रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. याच गुन्ह्यांत आरोपी सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पिडीत महिला ही शनिवारी हरिद्वार येथून मुंबईत आली होती. यावेळी तिचा एक नातेवाईक होते. रात्री उशिरा ते दोघेही वांद्रे रेल्वे टर्मिनस स्थानकात उभ्या असलेल्या रिकाम्या ट्रेनमध्ये झोपले होते. महिलेला एकटी पाहून आरोपी ट्रेनमध्ये चढला आणि त्याने तिच्यावर जबदस्तीने लैगिंक अत्याचार केला होता. या घटनेनंतर तो पळून गेला होता. घडलेला प्रकार तिने तिच्या नातेवाईकाला सांगितला. त्यानंतर त्यांनी तिथे उपस्थित रेल्वे पोलिसांना सांगितला. या महिलेची जबानी नोंदवून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध लैगिंक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला होता. या घटनेची वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी गंभीर दखल घेत आरोपीच्या अटकेसाठी विशेष मोहीम घेण्याचे आदेश दिले होते.
या आदेशानंतर वांद्रे रेल्वे पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी आरोपीचा शोध सुरु केला होता. सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी तासाभरात एका आरोपीला संशयित चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यानेच या महिलेवर लैगिंक अत्याचार केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला रविवारी दुपारी वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
ज्या वेळेस ही घटना घडली, त्यावेळी पिडीत महिलेचा नातेवाईक काही कामासाठी बाहेर गेला होता. त्यामुळे ही महिला एकटीच असल्याची संधी साधून आरोपीने तिच्यावर लैगिंक अत्याचार केला. रेल्वे स्थानकात रेल्वे पोलिसांसह सुरक्षा कर्मचारी तैनात असतात. मात्र या घटनेच्या वेळेस तिथे कोणीही नव्हते. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश वरिष्ठांकडून देण्यात आले आहे. या प्रकरणात कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर सक्त कारवाई करण्यात येणार आहे.