व्यापार्याची साडेदहा लाखांची कॅश लुटणार्या तिघांना अटक
फौजदार महिलेनेच इतर सातजणांच्या मदतीने कट रचल्याचे उघड
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
4 सप्टेंबर 2025
मुंबई, – गुजरात येथे कपडे खरेदीसाठी वांद्रे रेल्वे टर्मिनस येथे आलेल्या एका कापड व्यापार्याची साडेदहा लाखांची कॅश पोलीस असल्याची बतावणी करुन लुटणार्या टोळीचा रेल्वेच्या गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली. याप्रकरणी एका महिलेसह तिघांना पोलिसांनी अटक केली. विजया निलकंठ इंगवले, निलेश दिपक कळसुलकर आणि प्रविण वेदनाथ गुप्ता अशी या तिघांची नावे असून यातील विजया इंगवले ही महिला फौजदार आहे. ती सध्या वांद्रे रेल्वे पोलीस ठाण्यात कार्यरत असून तिनेच या संपूर्ण कटाची आखणी केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अटकेनंतर या तिघांनाही वांद्रे येथील लोकल कोर्टाने 10 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याचे पोलीस निरीक्षक रोहित सावंत यांनी सांगितले. यापूर्वी मुंबई सेंट्रल येथील लुटमारीच्या गुन्ह्यांत चार पोलिसांना सेवेतून निलंबित करण्यात आल्याची घटना ताजी असताना विजया इंगवले हिच्या अटकेने रेल्वे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
विकास मुकेश गुप्ता हे कापड व्यापारी असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत मालाड परिसरात राहतात. त्यांच्या मालकीचे कांदिवली येथे कपड्याचे दुकान आहे. अनेकदा ते गुजरात येथून कपडे आणून त्याची मुंबईत विक्री करतात. 1 सप्टेंबरला ते गुजरातला कपडे खरेदीसाठी वांद्रे रेल्वे टर्मिनस येथे आले होते. गुजरातला जाणार्या गाडीची चौकशी केल्यानंतर ते टर्मिनसच्या मेन हॉलमधील रेल्वे कॅण्टीनजवळ होते. याच दरम्यान तिथे दोन तरुण आले. या दोघांनी त्यांना पोलीस असल्याची बतावणी करुन त्यांच्या बॅगेची तपासणी सुरु केली होती. यावेळी त्यांच्या बॅगेत साडेदहा लाखांची कॅश होती. या कॅशबाबत विचारणा करुन त्यांनी त्यांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात यावे लागेल अशी धमकी दिली होती. यावेळी त्यांनी त्यांची ओळख सांगून आपण गुजरात येथे कपडे खरेदीसाठी जात असल्याचे सांगूनही ते दोघेही काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांनी कॅशबाबत पुरावा सादर करावा लागेल असे सांगून त्यांच्याकडील साडेदहा लाखांची कॅश घेतली. ही रक्कम परत मिळणार नाही असे सांगून ते दोघेही तेथून पळून गेले.
हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी घडलेला प्रकार वांद्रे रेल्वे पोलिसांना सांगून दोन्ही तोतया पोलिसांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपीविरुद्ध तोतयागिरी करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. अलीकडेच्या काळात अशाच प्रकारचे काही गुन्हे घडल्याने त्याची पोलीस आयुक्त एम. के कलासागर, पोलीस उपायुक्त प्रज्ञा जेडगे, सुनिता साळुंखे-ठाकरे यांनी गंभीर दखल घेत या गुन्ह्यांचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग केला होता. तसेच आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र रानमाळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय खेडकर, पोलीस निरीक्षक रोहित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुळे, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक माधुरी घाडगे, सहाय्यक फौजदार क्षीरसागर, महिला फौजदार गोहिल, पोलीस हवालदार भोजने, थोरात, कुंभार, रेडेकर, काळे, पोलीस शिपाई वाल्डे, मागाडे, महिला शिपाई गडगे यांनी तपास सुरु केला होता. वांद्रे रेल्वे टर्मिनस रेल्वे स्थानकासह आसपासच्या परिसरातील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेऊन आरोपींची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला होता.
या फुटेजसह तांत्रिक माहितीवरुन निलेश कळसुलकर आणि प्रविण गुप्ता या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत या गुन्ह्यांत त्यांचा सहभाग उघडकीस आला. त्यांनी त्यांच्यासह इतर सहाजणांचा सहभाग असल्याचे सांगून त्यात वांद्रे रेल्वे पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला फौजदार विजया इंगवले ही मुख्य सूत्रधार असल्याचे सांगितले. त्यानंतर विजयाला पोलिसांनी ताब्यात घेतले. तिने या संपूर्ण कटात तिचा सहभाग असल्याचे सांगून तिने इतर सातजणांच्या मदतीने हा गुन्हा केल्याचे सांगितले. या कबुलीनंतर तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्यांना वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना बुधवार 10 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत इतर पाचजणांचा सहभाग उघडकीस आला असून त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. या आरोपींकडून सर्व रक्कम लवकरच हस्तगत केली जाणार असल्याचे पोलीस निरीक्षक रोहित सावंत यांनी सांगितले.