मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
2 डिसेंबर 2025
मुंबई, – गर्दीचा फायदा घेऊन उपनगरीय लोकलमध्ये चोरी करणार्या एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराला वांद्रे रेल्वे पोलिसांनी अटक केली. अब्दुल जलील अरब शेख असे या 30 वर्षीय आरोपीचे नाव असून त्याच्या अटकेने मोबाईलसह सोनसाखळी चोरीच्या सात गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याच्याकडून पोलिसांनी चोरीचे मोबाईल, सोनसाखळीसह इतर मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.
यातील तक्रारदार महिला ही 15 नोव्हेंबरला राम मंदिर रेल्वे स्थानकातून खार रेल्वे स्थानकात आली होती. रात्री साडेआठ वाजता ती लोकलमधून उतरुन जात होती. यावेळी मागून आलेल्या एका अज्ञात व्यक्तीने तिच्या गळ्यातील सोनसाखळी चोरी करुन पलायन केले होते. या घटनेनंतर तिने वांद्रे रेल्वे पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी सोनसाखळी चोरीचा गुन्हा नोंदवून आरोपीचा शोध सुरु केला होता.
रेल्वे स्थानकासह परिसरातील सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन पोलीस आयुक्त एम. राकेश कलासागर, पोलीस उपायुक्त प्रज्ञा जेडगे, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र रानमाळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भुपेंद्र टेलर, पोलीस उपनिरीक्षक साहेबराव कालापाड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कृष्णराव चव्हाण, रामचंद्र खुस्पे, पोलीस हवालदार प्रविण घार्गे, वैभव शिंदे जाधव, विकास रासकर, सतीश फडके, अमरसिंग वळवी, मयुर पाटील, सुनिल मागाडे, पद्मा केंजळे, हिरामण शिंदे, पोलीस अंमलदार स्वप्नील नागरे, आकाश सोनावणे यांनी अब्दुल शेख याला संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते.
चौकशीत त्यानेच तक्रारदार महिलेची सोनसाखळी चोरी केल्याची कबुली दिली. तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्या अटकेने सात गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले. वांद्रे, बोरिवली, अंधेरी, दादर, कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्यातील सात गुन्ह्यांचा समावेश आहे. या गुन्ह्यांतील सोन्याची चैन, मंगळसूत्राचे तुकडे, मोबाईल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. अब्दुल जलील हा मूळचा कोलकाताचा रहिवाशी असून तो गर्दीच्या वेळेस लोकलमधील प्रवाशांचे मोबाईल आणि सोनसाखळी चोरी करुन पळून जात असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.