13.83 कोटीच्या चरस तस्करीप्रकरणी संशयिताची चौकशी सुरु

कारागृहात असलेल्या आरोपीचा रेल्वे पोलिसांकडून ताबा

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
26 मार्च 2026
मुंबई, – गोरखपूर-मुंबई या अवध एक्सप्रेस या गाडीतून आणलेल्या चरस तस्करीचा वांद्रे रेल्वे पोलिसांनी पर्दाफाश केल्यानंतर याच गुन्ह्यांत एका संशयिताची रेल्वे पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. मुन्ना नूर अन्सारी असे या आरोपीचे नाव असून ड्रग्जच्या गुन्ह्यांत तो कारागृहात होता, कारागृहातून ताबा घेतल्यानंतर त्याची या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी चौकशी सुरु केली असून या चौकशीतून काही धक्कादायक खुलासे बाहेर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे. या वृत्ताला वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहाजी निकम यांनी दुजोरा दिला आहे.

शनिवारी 21 फेब्रुवारीला सव्वाचार वाजता गोरखपूर येथून मुंबईतील वांद्रे रेल्वे टर्मिनस स्थानकात गोरखपूर-मुंबई ही गाडी फलाट क्रमांक चारवर आली होती. यावेळी रेल्वे पोलीस संशयित प्रवाशांसह त्यांच्या सामानाची तपासणी करत होते. याच दरम्यान जनरल डब्ब्यात एक संशयित बॅग असल्याची माहिती रेल्वे पोलिसांना एका सफाई कर्मचार्‍याकडून प्राप्त झाली होती. या घटनेनंतर या पथकाने घटनास्थळी धाव घेतली होती. रेल्वे पोलिसांसह रेल्वे पोलीस फोर्स, फ्रॉरेन्सिक टिम आणि श्वान पथकाने पंचनामा करुन ती बॅग ताब्यात घेतली होती. या बॅगेची तपासणी केल्यानंतर त्यात या अधिकार्‍यांना 31 पॅकेट सापडले. या पॅकेटमध्ये उच्च प्रतीचे चरस होते. या चरसचे वजन 13 किो 834 ग्रॅम असून आंतरराष्ट्रीय बाजारात चरसची किंमत 13 कोटी 83 लाख 40 हजार रुपये इतकी होती.

चरसचा हा साठा गोरखपूर येथून मुंबईत पाठविण्यात आला होता. मात्र ती बॅग घेण्यासाठी कोणीही रेल्वे स्थानकात आले नाही किंवा रेल्वे स्थानकातील पोलीस बंदोबस्त पाहिल्यानंतर अज्ञात व्यक्तीने ती बॅग जनरल डब्ब्यात ठेवून पलायन केले असावे असा पोलिसांचा अंदाज होता. चरसचा हा साठा ताब्यात घेतल्यानंतर वांद्रे रेल्वे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहाजी निकम यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी तपास करत होते. हा तपास सुरु असताना पोलिसांनी मुन्ना अन्सारी याला संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते.

मुन्ना हा ड्रग्जच्या गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यांत तो गेल्या चौदा महिन्यांपासून कारागृहात होता. मात्र कारागृहात राहूनही तो त्याच्या सहकार्‍यांच्या मदतीने ड्रग्जचे व्यवहार करत होते. ही माहिती प्राप्त होताच त्याचा रेल्वे पोलिसांनी ताबा घेतला होता. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला 4 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

या वृत्ताला वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहाजी निकम यांनी दुजोरा दिला आहे. मुन्ना हा ड्रग्जच्या गुन्ह्यांत गेल्या चौदा महिन्यांपासून कारागृहात होता. या ड्रग्ज प्रकरणात त्याच्याकडून जास्तीत जास्त माहिती काढण्याचा पोलीस प्रयत्न करत आहे. या गुन्ह्यांत त्याचा प्रत्यक्ष सहभाग उघडकीस आला नसला तरी त्याच्याकडून अनेक खुलासे बाहेर येण्याची शक्यता आहे असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहाजी निकम यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page