वांद्रे येथील पॉश सोसायटीमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
दोन महिला दलालांना अटक तर अल्पवयीन मुलीची सुटका
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१८ फेब्रुवारी २०२५
मुंबई, – केअरटेकर म्हणून जबाबदारी घेतलेल्या एका अल्पवयीन मुलीच्या मदतीने राहत्या घरी सेक्स रॅकेट चालविणार्या एका टोळीचा गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी वेश्यादलाल असलेल्या दोन्ही महिलांना पोलिसांनी अटक करुन त्यांच्या तावडीतून एका पंधरा वर्षांच्या मुलीची सुटका केली. या मुलीची मेडीकलनंतर बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. सोनिया आणि आकृती अशी या दोन महिलांची नावे असून त्यांच्याविरुद्ध लैगिंक अत्याचारासह पिटा आणि पोक्सो कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. याच गुन्ह्यांत त्यांना विशेष पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
वांद्रे येथील एका पॉश सोसायटीमध्ये सेक्स रॅकेट चालत असून काही या रॅकेटमधील महिला अल्पवयीन मुलींना ग्राहकांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास प्रवृत्त करत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकार्यांना मिळाली होती. या माहितीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत त्याची शहानिशा करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलिसांनी बोगस ग्राहकाची मदतीने या बातमीची शहानिशा सुरु केली होती. त्यात तथ्य असल्याचे आढळून येताच या पथकाने शनिवारी सायंकाळी वांद्रे येथील पॉश निवासी इमारतीच्या फ्लॅटमध्ये छापा टाकला होता. यावेळी पोलिसांनी सोनिया आणि आकृती नावाच्या दोन वेश्यादलाल महिलांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
याच फ्लॅटमधून पोलिसांनी एका पंधरा वर्षांच्या मुलीला ताब्यात घेतले होते. तिच्या चौकशीतून या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले होते. तपासात सोनिया या फ्लॅटमध्ये राहत असून आकृती ही तिची मैत्रिण आहे. ताब्यात घेतलेली अल्पवयीन मुलगी उत्तरप्रदेशच्या आझमगढची रहिवाशी आहे. काही महिन्यांपासून ती सोनियासोबत तिच्याच फ्लॅटमध्ये राहत होती. सोनिया ही आकृतीच्या मदतीने तिच्या राहत्या घरातून सेक्स रॅकेट चालवत होती. त्यासाठी ती पिडीत मुलीला ग्राहकांसोबत पाठवत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर या तिघांनाही वांद्रे पोलिसांकडे सोपविण्यात आले होते. याप्रकरणी एका पोलीस उपनिरीक्षकाच्या तक्रारीनंतर वांद्रे पोलिसांनी सोनिया आणि आकृतीविरुद्ध लैगिंक अत्याचारासह पोक्सो आणि पिटाच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच या दोघींनाही पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्यांना विशेष पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. पिडीत मुलीची मेडीकल करण्यात आली असून तिला बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे. या कारवाईत पोलिसांनी तीन हजाराची कॅश, दोन मोबाईल, सिमकार्ड आणि इतर साहित्य जप्त केले आहेत.