वांद्रे येथे 20 वर्षांच्या भावी कबड्डीपट्टूची आत्महत्या
आजारामुळे नैराश्यातून गळफास घेऊन जीवन संपविले
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
3 सप्टेंबर 2025
मुंबई, – वांद्रे येथे एका 20 वर्षांच्या भावी कबड्डीपट्टूने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मोहम्मद आसिफ खान असे या तरुणाचे नाव असून त्याने आजारामुळे आलेल्या नैराश्यातून त्याने घरातच गळफास घेऊन जीवन संपविल्याचे बोलले जाते. दरम्यान मोहम्मद आसिफला वेळीच औषधोपचार मिळाले नाही, त्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी पोलिसांवर केला होता, मात्र या वृत्ताचे पोलिसांकडून खंडन करण्यात आले आहे.
मोहम्मद आसिफ हा वांद्रे येथील चर्चजवळील चिंबई गावात त्याच्या कुटुंबियांसोबत राहत होता. त्याने अलीकडेच मर्चंट नेव्हीचा कोर्स पूर्ण केला होता. तो चांगला कबड्डीपट्टू म्हणून परिचित होता. भविष्यात तो चांगला कबड्डीपट्टू झाला असता. मात्र सहा महिन्यांपूर्वीच त्याचा अपघात झाला होता. त्यात त्याच्या पायाला दुखापत झाली होती. त्यावर त्याचे औषधोपचार सुरु होते. मात्र त्यातून त्याला काही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून तो प्रचंड मानसिक तणावात होता.
बुधवारी त्याची आई कामानिमित्त बाहेर गेली होती तर त्याचा भाऊ कॉलेजला निघून गेला होता. सायंकाळी त्याने मोहम्मद आसिफला कॉल केला, मात्र त्याने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्याच्या भावाने शेजार्यांना ही माहिती सांगून मोहम्मद आसिफला कॉल करण्यास सांगण्याची विनंती केली. यावेळी शेजार्यांना मोहम्मद आसिफने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. ही माहिती नंतर वांद्रे पोलिसांना देण्यात आली होती. मात्र पोलिसांनी त्याला वेळीच हॉस्पिटलमध्ये दाखल केले नाही. त्यामुळे त्याचा हॉस्पिटलमध्ये नेण्यापूर्वीच मृत्यू झाला असा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला.
या आरोपाचे वांद्रे पोलिसांनी खंडन केले. प्राथमिक तपासात मोहम्मद आसिफ हा अपघातानंतर मानसिक तणावात होता. त्यातून आलेल्या नैराश्यातून त्याने गळफास घेऊन जीवन संपविल्याचे बोलले जाते. याप्रकरणी त्याच्या नातेवाईकांची पोलिसांनी जबानी नोंदवण्यात आली आहे. त्यांनी कोणावरही संशय व्यक्त केला नाही किंवा कोणाविरुद्ध तक्रार केली नाही. त्यामुळे वांद्रे पोलिसांनी एडीआरची नोंद केल्याचे एका अधिकार्याने बोलताना सांगितले.