मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१७ जुलै २०२४
मुंबई, – वांद्रे-वरळी सी लिंकवर भावेश नगीन शेठ या ५८ वर्षांच्या व्यावसायिकाने समुद्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. तीन तासानंतर त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. भावेश यांच्या आत्महत्येमागील कारणाचा खुलासा होऊ शकला नाही. मात्र आर्थिक कारणास्तव त्यांनी समुद्रात उडी घेऊन जीवन संपविल्याचे बोलले जाते. आत्महत्येपूर्वी त्यांनी त्यांच्या मुलाला व्हिडीओ कॉल केला होता, त्यामुळे या मुलासह इतर कुटुंबियांची लवकरच पोलिसांकडून जबानी नोंदविण्यात येणार आहे. या जबानीतून त्यांच्या आत्महत्येमागील अधिकृत कारण समजू शकेल असे पोलिसांकडून सांगण्यात आले. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी एडीआरची नोंद करुन तपास सुरु केला आहे.
भावेश शेठ हे घाटकोपरचे रहिवाशी असून व्यावसायिक आहेत. दुपारी ते त्यांच्या कारमधून वांद्रे-वरळी सी लिंकवर आले होते. सी लिंकवर कार थांबवून त्यांनी त्यांच्या मुलाला व्हिडीओ कॉल केला होता. त्याच्याशी संभाषण केल्यानंतर ते कारमधून खाली उतरले. त्यानंतर त्यांनी सी लिंकवरुन समुद्रात उडी घेतली होती. ही माहिती मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुममधून प्राप्त होताच वांद्रे पोलिसांनी अग्निशमन दलासह घटनास्थळी धाव घेतली होती. तीन तास शोधमोहीम घेतल्यानंतर सायंकाळी त्यांना पाण्यातून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांना वांद्रे येथील भाभा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथे त्यांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. त्यांच्या कारमध्ये पोलिसांना सुसायट नोट सापडली आहे. त्यात त्यांनी त्यांच्या आत्महत्येला कोणीही जबाबदार नसल्याचे नमूद केले. मात्र त्यांच्या आत्महत्येमागील कारण समजू शकले नाही. गेल्या काही दिवसांपासून ते आर्थिक अडचणीत होते. त्यातून त्यांना प्रचंड नैराश्य आले होते. याच नैराश्यातून त्यांनी त्यांचे जीवन संपविण्याचा निर्णय घेतला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. त्यांनी शेवटचे त्याच्या मुलाला व्हिडीओ कॉल केला होता. त्यामुळे त्याच्यासह इतर कुटुंबियांची चौकशी करुन त्यांची जबानी नोंदविण्यात येणार आहे. या जबानीतून या आत्महत्येमागील कारण समजू शकेल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.