35 वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी नागरिकाला अटक
सहा वर्षांचा असताना बांगलादेशातून भारतात आल्याची कबुली
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
29 जानेवारी 2026
मुंबई, – गेल्या 35 वर्षांपासून भारतात वास्तव्यास असलेल्या एका बांगलादेशी नागरिकाला मंगळवारी साकिनाका पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. बादशाह अफजल मुल्ला असे या 41 वर्षीय नागरिकाचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी एक बोगस भारतीय आधारकार्ड जप्त केले आहेत. सहा वर्षांचा असताना तो बांगलादेशातून उपासमारीसह बेरोजगारीला कंटाळून भारतात आल्याचे सांगितले. तेव्हापासून तो भारताच्या वेगवेगळ्या शहरात वास्तव्यास होता. अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
साकिनाका परिसरात काही बांगलादेशी वास्तव्यास असल्याची माहिती साकिनाका पोलिसांच्या एटीएसला मिळाली होती. या माहितीनंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू चव्हाण, पोलीस शिपाई रमेश अहेर, गवारे, पुलाते, तांबे यांनी परिसरात गस्त सुरु करुन या बांगलादेशी नागरिकांच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असताना मंगळवारी 27 जानेवारीला सायंकाळी साडेसात वाजता खैरानी रोड, यादव नगर परिसरातून पोलिसांनी संशयिताला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
चौकशीत त्याने तो बांगलादेशी नागरिक असल्याचे सांगितले. बादशाह मुल्ला असे या नागरिकाचे नाव असून तो मूळचा बांगलादेशच्या नोडाईल, कलियाचा रहिवाशी आहे. सध्या तो भाईंदर येथील उत्तन रोड, मशिदीसमोरील डोंगरी गावात राहत होता. त्याच्याकडून पोलिसांनी एक आधारकार्ड जप्त केले असून ते आधारकार्ड बोगस होते. बांगलादेशातील बेरोजगारी आणि उपासमारीला कंटाळून तो सहा वर्षांचा असताना भारतात वास्तव्यास होता.
या दरम्यान त्याने विविध ठिकाणी नोकरी केल्याचे सांगितले. तपासात आलेल्या या माहितीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी भारतीय न्याय सहिता, पारपत्र अधिनियमच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला दुसर्या दिवशी अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी त्याला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
भारतात वास्तव्यास असताना त्याने भारतीय नागरिक असल्याचे काही बोगस दस्तावेज बनविले होते, त्याला ते दस्तावेज कोणी दिले, त्याच्या परिचित इतर कोणीही बांगलादेशी नागरिक मुंबईसह इतर शहरात वास्तव्यास आहेत का याचा पोलीस तपास करत आहेत.