मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२१ जानेवारी २०२५
मुंबई, – गेल्या वर्षी चेंबूर येथून अटक केलेल्या तिन्ही बांगलादेशी नागरिकांना किल्ला कोर्टाने दोषी ठरवून कारावासासह दंडाची शिक्षा सुनावली आहे. चंचल हुसैन अनिस सरदर, फिरदोश कासिम गाजी आणि मोहम्मद शाहिद आकास अली शेख अशी या तिघांची नावे आहे. शिक्षेनंतर या तिघांची लवकरच बांगलादेशात रवानगी करण्यात येणार आहे. दरम्यान चालू महिन्यांत गुन्हे शाखेने बांगादेशीसंदर्भात २८ गुन्ह्यांची नोंद करुन ४२ बांगलादेशी नागरिकांना अटक केली. या नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात बोगस भारतीय नागरिक असल्याचे दस्तावेज सापडल्याचे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी सांगितले.
मुंबई शहरात अनधिकृतपणे वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी नागरिकांविरुद्ध मुंबई पोलिसांच्या स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखा, एटीएस आणि आय शाखेच्या अधिकार्यांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. या मोहीमेंतर्गत आतापर्यंत अनेक बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात पोलिसांना यश आले होते. या आरोपींच्या चौकशीतून त्यांचे इतर काही सहकारी आणि नातेवाईक मुंबईसह ठाणे, नवी मुंबईत राहत असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. या माहितीनंतर या बांगलादेशी नागरिकांविरुद्ध विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त दत्त नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त दत्तात्रय नाळे यांनी गुन्हे शाखेला दिले होते.
ही शोधमोहीम सुरु असताना २४ एप्रिल २०२४ रोजी काही बांगलादेशी नागरिक मुंबई शहरात अनधिकृतपणे वास्तव्यास असल्याची माहिती गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाचे प्रभारी पोलीस निरीक्षक मिलिंद काठे यांा मिळालली होती. या माहितीनंतर पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या आदेशावरुन प्रभारी पोलीस निरीक्षक मिलिंद काठे, समीर लोणकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश देशमुख, पोलीस उपनिरीक्षक एम. एन कुरेशी, सहाय्यक फौजदार प्रकाश कदम, पोलीस हवालदार जगदाळे, पाडवी, सकट, महिला पोलीस हवालदार मोरे, पोलीस शिपाई आव्हाड, गावडे, उथळे यांनी चेंबूर परिसरात साध्या वेशात पाळत ठेवली होती. यावेळी आरसीएफजवळील म्हाडा कॉलनी, विष्णू नगर परिसरातून पोलिसांनी चंचल सरदर, फिरदोश गाजी आणि मोहम्मद शाहिद शेख या तीन बांगलादेशी नागरिकांना अटक केली होती.
तपासात ते तिघेही अनधिकृतरीत्या आणि योग्य त्या प्रवासी कागदपत्राशिवाय भारतात प्रवेश करुन बोगस भारतीय कागदपत्रांच्या आधारे मुंबई शहरात राहत होते. त्यांच्याविरुद्घ भादवीसह विदेशी व्यक्ती अधिनियम कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या तिघांविरुद्ध पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर यांनी किल्ला कोर्टात आरोपपत्र सादर केले होते. या खटल्याची सुनावणी अलीकडेच पूर्ण झाली. यावेळी न्या. कांचन झंवर यांनी पोलिसांनी सादर केलेले पुरावे, साक्षीदारांची जबानीवरुन तिन्ही आरोपींना दोषी ठरवून तिघांनाही कारावासासह दंडाची शिक्षा सुनावली आहे.
१ जानेवारी २०२५ पासून बांगलादेशी घुसखोरांना आळा घालण्यासाठी गुन्हे शाखेने विशेष मोहीम राबवून आतापर्यंत २८ गुन्हे दाखल केले आहेत. या गुन्ह्यांत ४२ बांगलादेशी नागरिकांना अटक केली. त्यात एका भारतीय नागरिकाचा समावेश असून त्याच्यावर संबंधित बांगलादेशी नागरिकांची मदत केल्याचा आरोप आहे. या बांगलादेशी नागरिकांकडू पोलिसांनी चौदा आधारकार्ड, चार पॅनकार्ड, चार मतदान कार्ड आणि तीन बांगलादेशी पासपोर्ट जप्त केले आहे. या गुन्ह्यांचा पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडून तपास सुरु आहे.