मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२९ जानेवारी २०२५
मुंबई, – ढाका येथे जाण्यासाठी आलेल्या शबीकुन नाहर रुची या बांगलादेशी महिलेस छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमिग्रेशन अधिकार्यानी अटक करुन पुढील कारवाईसाठी सहार पोलिसांकडे सोपविले. तिने दोन वेगवेगळ्या नावाने तिनदा पासपोर्टचे नूतनीकरण केले असून याच भारतीय पासपोर्टवर तिने सौदी अरेबिया, बांगलादेशासह इतर देशात प्रवास केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याच गुन्ह्यांत ती सध्या पोलीस कोठडीत असून तिची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.
निलेश यादवराव देशमुख हे कांदिवलीतील रहिवाशी असून सध्या मुंबई पोलीस दलातील विशेष शाखा दोनमध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहे. त्यांची पोस्टिंग छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आहे. मंगळवारी सकाळी ते आंतरराष्ट्रीय विमानतळावर कर्तव्य बजावत होते. यावेळी ढाका येथे निघालेल्या एका महिलेला त्यांनी ताब्यात घेतले होते. तिच्याकडे भारतीय पासपोर्ट व बांगलादेशचा व्हिसा होता. पासपोर्टवरुन ती बांगलादेशातून दोन वेळा जाऊन आली होती. याबाबत विचारणा केल्यानंतर तिने समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यामुळे तिची चौकशी केली असता तिने ती बांगलादेशी नागरिक असल्याची कबुली दिली. ती तिच्या आई-वडिलांसोबत बांगलादेशातून भारतात आली होती. काही वर्ष कोलकाता येथे राहिल्यानंतर ते सर्वजण नाशिकच्या मालेगावात स्थायिक झाले होते. २००६ साली विवाह केल्यानंतर ती मुंबईत राहण्यासाठी आली होती.
याच दरम्यान तिने भुनेश्वर येथून शुबीकुन नाहर अबू अहमद या नावाने भारतीय पासपोर्ट मिळविले होते. याच पासपोर्टवर ती सौदी अरेबिया येथे गेली होती. तिथे काही वर्ष काम केल्यानंतर तिने २०२१ साली पासपोर्टचे नूतनीकरण केले होते. विवाहानंतर तिला सबीना हुमायून कबीर खांडेकर या नावाने पासपोर्ट मिळाला होता. तिच्या मोबाईलची तपासणी केल्यानंतर तिच्या नावाने काही दस्तावेज सापडले, त्यावरुन ती बांगलादेशी नागरिक असल्याचे उघडकीस आले. गेल्या २० वर्षांपासून ती भारतात वास्तव्यास होती. याच दरम्यान तिने तीन वेळा दोन वेगवेगळ्या नावाने पासपोर्टचे नूतनीकरण केले होते. विदेशासह ती अनेकदा बांगलादेशात गेली होती.
तपासात आलेल्या या माहितीनंतर तिला पुढील कारवाईसाठी सहार पोलिसांकडे सोपविण्यात आले होते. याप्रकरणी निलेश देशमुख यांच्या तक्रारीवरुन तिच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत बुधवारी तिला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर तिला अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने तिला पोलीस कोठडी सुनावली आहे.
अंधेरीतून पिता-पूत्र बांगलदेशींना अटक
अन्य एका कारवाईत अंधेरीतील वर्सोवा-यारी रोड परिसरातून पिता-पूत्र बांगलादेशींना वर्सोवा पोलिसांनी अटक केली. मोनेर बुकतियार शेख आणि बुकतियार दोसुर शेख अशी या पिता-पूत्रांची नावे असून ते दोघेही गेल्या आठ वर्षांपासून भारतात वास्तव्यास असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. गस्त घालत असताना वर्सोवा पोलिसांना काही बांगलादेशी नागरिकाबाबत माहिती मिळाली होती. या माहितीनंतर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक उगले, पोलीस शिपाई प्रशांत खैरनार, जाधव, पवार यांनी यारीरोड-वर्सोवा, कवठेखाडी परिसरातून या दोन्ही पिता-पूत्रांना ताब्यात घेतले. चौकशीत ते दोघेही बांगलादेशी नागरिक असल्याचे उघडकीस आले. याच परिसरात राहणारे शेख पिता-पूत्र मजुरीचे काम करत होते. आठ वर्षापूर्वी मोनेर हा बांगलादेशातून भारतात आला होता. त्यानंतर त्याने त्याच्या वडिलांना भारतात आणले होते. बुकतियार हा सत्तर वर्षाचा वयोवृद्ध असून त्याची पत्नी, लहान मुलगा आणि मुलगी बांगलादेशात राहतात. ते दोघेही नियमित त्यांच्या संपर्कात असल्याचे त्यांच्या मोबाईलच्या कॉल रेकॉर्डवरुन उघडकीस आले आहे. बांगलादेशातील गरीबीसह उपासमारीला कंटाळून ते दोघेही नोकरीसाठी भारतात आले होते.