बोगस दस्तावेज बनविण्यास मदत केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा
बांगलादेशी महिलेस अटक तर इतर दोघांचा शोध सुरु
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
3 मे 2025
मुंबई, – गेल्या 27 वर्षांपासून भारतात अनधिकृतपणे वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी महिलेला बोगस दस्तावेज बनविण्यास मदत केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध वडाळा टी टी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शाहनारा अफसारी शेख, शेबाज इक्बाल राखांगी आणि अनिल शिंदे अशी या तिघांची नावे आहेत. गुन्हा दाखल होताच शाहनारा शेख हिला पोलिसांनी अटक केली असून याच गुन्ह्यांत ती सध्या पोलीस कोठडीत आहे. इतर दोघांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
गुरुवारी रात्री सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज शेवाळे, पोलीस हवालदार गिते, पोलीस शिपाई सांगळे, महिला पोलीस शिपाई कोमल जाधव आदींचे एक पथक परिसरात गस्त घालत होते. वडाळा येथील सॉल्टपॅन रोड, विजयनगर, बालाजी ज्वेलर्स परिसरातून जात असताना या पथकाने शाहनारा नावाच्या एका महिलेस संशयावरुन चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीदरम्यान या महिलेने ती बांगलादेशी नागरिक असल्याची कबुली देताना ती मूळची बांगलादेशातील खुना, जाशोर, मुडोलीची रहिवाशी असल्याचे सांगितले. सध्या ती तिच्या दोन मुलांसोबत वडाळा येथील अॅण्टॉप हिल, बरकतअली दर्गा रोड, रमामातावाडी परिसरात राहत होती.
नऊ वर्षांची असताना 1999 साली ती तिच्या मावशीसोबत बांगलादेशातून भारतात पळून आली होती. नंतर तिने अफसर अल्लादीन शेख या तरुणासोबत लग्न केले होते. 2020 रोजी तिच्या पतीचे निधन झाले होते. त्याच्यापासून त्याला दोन मुले आहेत. 27 वर्षांपासून भारतात वास्तव्यास असताना तिने भारतीय नागरिक असल्याचे अनेक बोगस पुरावे बनविले होते. त्यात जन्माचा दाखला, आधारकार्ड, पॅनकार्ड, रेशनकार्डसह इतर भारतीय दस्तावेजाचा समावेश होता. त्यापैकी जन्माचा दाखला तिला अनिल शिंदे तर इतर दस्तावेज शेबाजने बनवून दिले होते. या दस्तावेजाच्या मदतीने तिने सुरुवातीला स्वतला आणि नंतर दोन्ही मुलांचे पासपोर्ट बनविले होते.यातील शेबाज हा एजंट तर अनिल हा महानगरपालिकेच्या ई वॉर्डचा क्लार्क आहे.
तपासात हा प्रकार उघडकीस येताच शाहनारा शेख, शेबाज राखांगी आणि अनिल शिंदे यांच्याविरुद्ध बोगस दस्तावेज बनवून शासनाची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच शाहनारा शेख हिला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर तिला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होत. यावेळी कोर्टाने तिला पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत शेबाज आणि अनिल या दोघांनाही पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.