मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
12 मार्च 2025
मुंबई, – कर्जबाजारी झाल्याने भारतात नोकरीसाठी आलेल्या दोन बांगलादेशी बंधूंना मंगळवारी ओशिवरा पोलिसांच्या एटीएस पथकाने अटक केली. सुमन बाबू शेख आणि इमान बाबू शेख अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांकडून पोलिसांनी दोन मोबाईल जप्त केले आहेत. अटकेनंतर या दोघांनाही अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडीत आहे. कर्ज फेडण्यासाठी ते दोघेही मजुरीचे काम करत होते, गेल्या दोन वर्षांपासून ते मुंबई शहरात वास्तव्यास असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
जोगेश्वरीतील एस. व्ही रोडवर लझीज नावाचे एक हॉटेल असून याच हॉटेलजवळ काही बांगलादेशी नागरिक नोकरीनिमित्त येणार असल्याची माहिती ओशिवरा पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर मंगळवारी एटीएसचे पोलीस उपनिरीक्षक अनिल तपासकर, पोलीस शिपाई अजीज शेख, निकम, नाईक यांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवली होती. दुपारी पावणेदोन वाजता तिथे दोनजण आले होते. या दोघांची हालचाल संशयास्पद वाटताच त्यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यांची नावे सुमन शेख आणि इमान शेख असल्याचे उडकीस आले. ते दोघेही मिरा-भाईंदर परिसरात राहत असून मजुरीचे काम करतात. त्यांच्याकडे भारतीय नागरिक असल्याचे काही पुरावे मागितले असता त्यांनी कुठलेही पुरावे सादर केले नाही.
चौकशीदरम्यान त्यांनी ते दोघेही बांगलादेशी नागरिक असल्याचे सांगतले. त्यांच्यावर प्रचंड कर्ज होते. बांगलादेशात नोकरी मिळत नव्हती. बेरोजगारी आणि उपासमारीला कंटाळून तसेच कर्ज फेडण्यासाठी मुंबईत नोकरी मिळेल या आशेने ते दोघेही बांगलादेशातून भारतात पळून आले होते. गेल्या दोन वर्षांपासून ते दोघेही मिरा-भाईंदर परिसरात राहत होते. तिथे ते काम करुन स्वतचा उदरनिर्वाह चालवत होते. काही रक्कम ते त्यांच्या गावी पाठवत होते. त्यांच्याकडून पोलिसांनी दोन मोबाईल जप्त केले असून या मोबाईलची पाहणी केल्यानंतर ते दोघेही नियमित त्यांच्या कुटुंबिय, नातेवाईक आणि मित्रांच्या संपर्कात असल्याचे उघडकीस आले आहे.
या दोघांविरुद्ध भारतात अनधिकृतपणे प्रवेश करुन परकीय नागरिक आदेशाचे उल्लघंन केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्यांना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर दोघांनाही बुधवारी दुपारी अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या दोघांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. त्यांच्या परिचित इतर कोणी बांगलादेशी नागरिक मुंबईसह आसपासच्या शहरात राहत आहेत का याचा पोलीस तपास करत आहेत.