बोगस पासपोर्टवर तिसर्यांदा सौदीला जाण्याचा प्रयत्न फसला
आंतरराष्ट्रीय विमानतळावर २५ वर्षांच्या बांगलादेशी तरुणाला अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१२ एप्रिल २०२४
मुंबई, – तेरा वर्षांपूर्वी बांगलादेशातून मामासोबत भारतात अनधिकृतपणे प्रवेश केल्यानंतर दहा वर्षांपूर्वी पुण्यातील पासपोर्ट कार्यालयातून मिळविलेल्या भारतीय पासपोर्ट दोन वेळा तो सौदी अरेबियाला नोकरीसाठी गेला, मात्र तिसर्यांदा सौदीला जाण्याचा त्याचा प्रयत्न फसला आणि तो पकडला गेला. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या उस्मान किरमत सिद्धीकी ऊर्फ मोहम्मद ओसमान किरमतअली बिस्वास या २५ वर्षांच्या बांगलादेशी तरुणाचा इमिग्रेशन अधिकार्यांनी पर्दाफाश केला. बोगस दस्तावेज सादर करुन भारतीय पासपोर्ट मिळवून भारत-सौदी अरेबिया असा प्रवास करुन शासनाची फसवणुक केल्याचा त्याच्यावर आरोप असून याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मोहम्मद ओसमान हा शनिवारी रात्री उशिरा एक वाजता आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला होता. त्याला सौदी अरेबिया येथे जायचे होते, त्याच्या पासपोर्टची पाहणी केल्यानंतर त्याचा जन्म कोलकाताचा असून त्याने पासपोर्ट पुण्यात काढल्याचे दिसून आले. त्याच्या बोली भाषेवरुन तो बांगलादेशी नागरिक असल्याचा इमिग्रेशन अधिकार्यांना संशय आला होता. त्यामुळे त्याला अधिकार्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने तो बांगलादेशी नागरिक असल्याची कबुली दिली. तेरा वर्षांपूर्वी तो त्याचा मामा बादशाह याच्यासोबत बांगलादेशातून भारतात आला होता. दोन वर्ष कोलकाता येथे मजुरीचे काम केल्यानंतर तो पुण्यात कायमचा स्थायिक झाला होता. तेव्हापासून तो वाकडच्या मराठी स्कूलसमोरील मिल क्रमांक ३९२ मध्ये राहत होता. याच दरम्यान त्याने बोगस दस्तावेज बनवून २०१४ साली पुण्यातून उस्मान किरमत सिद्धीकी या नावाने भारतीय पासपोर्ट मिळविले होते. याच पासपोर्टवर जून २०१६ रोजी तो सौदी अरेबिया येथे नोकरीसाठी गेला होता. सप्टेंबर २०२२ साली भारतात आल्यानंतर सात महिन्यानंतर म्हणजे एप्रिल २०२३ रोजी तो पुन्हा गेल्या वर्षी सौदीला गेला. त्यानंतर तो मार्च २०२४ रोजी परत भारतात आला होता. त्याला पुन्हा सौदीला नोकरीसाठी जायचे होते. त्यासाठी तो शनिवारी रात्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला होता, मात्र तो बांगलादेशी असल्याचे उघडकीस येताच त्याला पुढील चौकशीसाठी सहार पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
याप्रकरणी भरत दिनकर चिंदगे या इमिग्रेशन अधिकार्याच्या तक्रारीवरुन त्याच्याविरुद्ध पोलिसांनी बोगस भारतीय पासपोर्ट बाळगून भारत-सौदी अरेबिया असा प्रवास केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला रविवारी स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.