मुंबई-व्हिएतनाममार्गे थायलंडला बोगस पासपोर्टवर प्रवास
आंतरराष्ट्रीय विमानतळावर बांगलादेशी नागरिकाला अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२९ मार्च २०२४
मुंबई, – मुंबईहून व्हिएतनाममार्गे थायलंडला बोगस पासपोर्टवर प्रवास करणार्या बांगलादेशी नागरिकाला आंतरराष्ट्रीय विमानतळावर सहार पोलिसांनी अटक केली. आपु जॉयसेन बरुआ असे या ३० वर्षीय नागरिकाचे नाव असून याच गुन्ह्यांत त्याला स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. ५० हजारामध्ये त्याने बोगस भारतीय पासपोर्ट मिळविल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.
शनिवारी थायलंडच्या बँकॉकहून आपू हा प्रवाशी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला होता. त्याच्या पासपोर्टची तपासणी केली असता त्याला पासपोर्ट पुण्यातील कार्यालयातून जारी करणयात आला होता. त्याचे जन्मस्थान कोलकाता असून त्याच्या बोली भाषेवरुन तो बांगलादेशी नागरिक असल्याचा इमिग्रेशन अधिकार्यांना संशय आला हेता. त्यामुळे चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने तो बांगलादेशी नागरिक असल्याची कबुली दिली. बांगलादेशी नागरिक असल्याचे त्याने काही कागदपत्रे दाखविले होते. दोन वर्षांपूर्वी तो बांगलादेशातून भारतात आला होता. कोलकाता येथे राहत असताना त्याला राहुलकुमार नावाच्या एका एजंटने ५० हजार रुपयांमध्ये बोगस पॅनकार्ड, आघारकार्डसह भारतीय पासपोर्ट बनवून दिले होते. पुण्यात राहत असताना त्याने गुरुजी आनंद म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली बौद्ध भिक्षुकी स्विकारली होती. जवळपास एक वर्ष तो आश्रमात वास्तव्यास होता. त्यानंतर तो पुन्हा कोलकाता येथील परगना, बरासात येथे गेला. १७ एप्रिलला तो मुंबईहून व्एितनामला आणि नंतर थायलंडला गेला होता. शनिवारी तो थायलंडहून पुन्हा मुंबईत आला होता. चौकशीतून आलेल्या माहितीनंतर त्याला पुढील कारवाईसाठी सहार पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले होते. याप्रकरणी इमिग्रेशन अधिकारी शैलेंद्रकुमार राकेश बाबू यांच्या तक्रारीवरुन सहार पोलिसांनी आपुविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.