उच्चशिक्षणासाठी विदेशात जाणार्या बांगलादेशी तरुणाला अटक
आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमिग्रेशन अधिकार्यांची कारवाई
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२५ ऑगस्ट २०२४
मुंबई, – उच्च शिक्षणासाठी कॅनडाला जाण्यासाठी आलेल्या एका २४ वर्षांच्या बांगलादेशी नागरिकाला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमिग्रेशन अधिकार्यांनी ताब्यात घेऊन सहार पोलिसांच्या स्वाधीन केले. सुब्रमण्यम सुखेन मलिक असे या तरुणाचे नाव असून तो गेल्या पंधरा वर्षांपासून भारतात वास्तव्यास असल्याचे उघडकीस आले आहे. पदवीपर्यंतचे शिक्षण कोलकाता येथे पूर्ण केल्यानंतर तो स्टुडंट व्हिसा घेऊन विदेशात उच्च शिक्षणासाठी जात होता, मात्र बांगलादेशच्या व्हिसामुळे त्याचा कॅनडाला जाण्याचा प्रयत्न फसला गेला. बोगस दस्तावेजाच्या मदतीने भारतीय पासपोर्ट बनवून फसवणुक केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
गुरुवारी रात्री दहा वाजता सुब्रमण्यम मलिक हा छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर म्युनिचमार्गे कॅनडा येथे जाण्यासाठी आला होता. त्याच्या पासपोर्ट, इमिग्रेशन आणि तिकिटाची पाहणी करताना इमिग्रेशन अधिकार्यांना त्याच्या पासपोर्टवर बांगलादेशाचा व्हिसा असल्याचे दिसून आला होता.या व्हिसाच्या मदतीने तो अनेकदा बांगलादेशात गेला होता. त्यामुळे त्याच्याकडे बांगलादेशात जाण्यामागील कारण विचारले असता त्याने समाधानकारक उत्तरे दिली नाही. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्याला या अधिकार्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीदरम्यान त्याने तो बांगलादेशी नागरिक असल्याचे सांगितले. पंधरा वर्षांपूर्वी तो बांगलादेशातून भारतात आलाद होता. तेव्हापासून तो कोलकाता येथे वास्तव्यास होता. याच दरम्यान त्याने स्वतचा आधारकार्ड, पॅनकार्ड बनवून घेतले होते. या कागदपत्राच्या आधारे त्याने तीन वर्षांपूर्वी भारतीय पासपोर्ट मिळविले होते. दहावी ते बारावीपर्यंतचे शिक्षण त्याने कोलकाता येथील चकदाह शाळेतून पूर्ण केले होते. बीबीएचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याला पोस्ट ग्रॅज्युऐशनसाठी विदेशात जायचे होते. त्यासाठी त्याने स्टुडंट व्हिसा घेतला होता. या व्हिसाच्या मदतीने तो कॅनडाला पुढील शिक्षणासाठी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला होता. मात्र त्याच्या पासपोर्टवर बांगलादेशचा व्हिसा दिसून आल्याने त्याचा पर्दाफाश झाला होता.
याप्रकरणी महिला पोलीस हवालदार रुपाली मिथुन साळुंखे यांच्या तक्रारीवरुन सुब्रमण्यम मलिकविरुद्ध सहार पोलिसांनी ३१८ (४), ३३६ (२), ३३६ (३), ३४० (२) भारतीय न्याय सहिता सहकलम १४ (अ), (ब), १२ विदेशी व्यक्ती अधिनियम कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याला बोगस आधारकार्ड, पॅनकार्ड, भारतीय पासपोर्ट तसेच स्टुडंट व्हिसा मिळवून देणार्या आरोपींचा पोलीस शोध घेत आहे.