रियाध-दोहाला जाणार्‍या दोन बांगलादेशी नागरिकांना अटक

दोघेही अनुक्रमे नऊ व पंधरा वर्षांपासून भारतात वास्तव्यास होते

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
९ सप्टेंबर २०२४
मुंबई, – रियाध आणि दोहा येथे जाण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या दोन बांगलादेशी नागरिकांना इमिग्रेशन अधिकार्‍यांनी ताब्यात घेऊन सहार पोलिसांच्या स्वाधीन केले. या दोघांविरुद्ध बोगस भारतीय पासपोर्टवर विदेशात जाण्याचा प्रयत्न करुन भारतीय पासपोर्ट ऍथोरिटीसह भारतीय इमिग्रेशन अधिकार्‍यांची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच गुन्ह्यांत मोहम्मद सॅमअल आलम मोहम्मद अस्कूर मंडल आणि मोहम्मद तोहिद अहमद या दोघांना सहार पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या दोघांनाही अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या दोघांना भारतीय नागरिक असल्याचे पुरावे आणि पासपोर्ट बनविण्यास मदत करणार्‍या एजंटचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

रविवारी रात्री दोन वाजता मोहम्मद सॅमअल हा सौदी अरेबिया येथे जाण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला होता. त्याच्या पासपोर्टसह बोर्डिंग पास, सौदीचे कामगार करार आदींची पाहणी करताना तो बांगलादेशी नागरिक असल्याचा संशय इमिग्रेशन अधिकार्‍याला आला होता. त्यामुळे त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. यावेळी त्याने तो बांगदेशी नागरिक असल्याची कबुली दिली. पंधरा वर्षांपूर्वी तो बांगलादेशातून अवैधरित्या भारतात आला होता. तेव्हापासून तो कोलकाता येथे वास्तव्यास होता. याच दरम्यान त्याने भारतीय निवडणुक आयोगाचे मतदार ओळखपत्र, पॅनकार्ड, आधारकार्ड बनविले होते. त्यानंतर त्याने दोन वर्षांपूर्वी पासपोर्टसाठी अर्ज केला होता. काही दिवसांनी त्याला पासपोर्ट मिळाले होते. याच पासपोर्टवर तो रियाध येथे नोकरीसाठी जाण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला होता. मात्र तिथे जाण्यापूर्वीच त्याला इमिग्रेशन अधिकार्‍यांनी चौकशीसाठी ताब्यात घेऊन सहार पोलिसांच्या स्वाधीन केले.

ही घटना ताजी असताना रविवारी सकाळी सव्वासात वाजता मोहम्मद तोहिद या अन्य एका बांगलादेशी नागरिकाला इमिग्रेशन अधिकार्‍यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. तो दोहा येथे जाण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला होता. त्याच्या बोली भाषेवरुन तो बांगलादेशी नागरिक असल्याचा संशय आल्यानंतर त्याला चौकशीसाठी ताब्या घेण्यात आले होते. त्याच्याकडे या अधिकार्‍यांना बोगस व्हिसा ऍप्लिकेशन फॉर्मसह बोगस भारतीय पासपोर्ट सापडले. एप्रिल २०१५ साली तो बांगलादेशातून रस्ते मार्गाने आसाममध्ये आला होता. तेव्हापासून तो करीमगंज परिसरात वास्तव्यास होता. या काळात त्याने भारतीय नागरिक असल्याचे बोगस दस्तावेज बनविले होते. या कागदपत्राच्या मदतीने त्याने २०१७ साली भारतीय पासपोर्ट प्राप्त केले होते. या दरम्यान तो अनेकदा बांगलादेशात गेला होता आणि तेथून पुन्हा भारतात आला होता. २०२१ साली त्याने पासपोर्ट हरविल्याचे सांगून नवीन बोगस भारतीय पासपोर्ट मिळविले होते. याच पासपोर्टवर तो दोहा येथे नोकरीसाठी जाणार होता.

या घटनेनंतर इमिग्रेशन अधिकार्‍यांनी दोन्ही बांगलादेशी नागरिकांना पुढील चौकशीसाठी सहार पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी मोहम्मद सॅमअल आणि मोहम्मद तोहिद यांच्याविरुद्ध ३१८ (४), ३३६ (२), (३), ३४० (२) भारतीय न्याय सहिता सहकलम १२ पासपोर्ट अधिनियम सहकलम १४ (अ), १४ (ब) विदेशी व्यक्ती अधिनियम कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत अटक केल्यांनतर त्यांना लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page