भारतीय पासपोर्टसह बांगलादेशी नागरिकाला विमानतळावर अटक
हिंदू महिलेशी लग्न करुन गुजरात येथून पासपोर्ट मिळविले
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
11 एपिल 2025
मुंबई, – भारतीय पासपोर्टवर बांगलादेशात जाण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय आलेल्या मोहम्मद शमीम मोहम्मद सत्तार नावाच्या एका बांगलादेशी नागरिकाला सहार पोलिसांनी अटक केली. विदेशात ओळख झालेल्या एका हिंदू महिलेशी लग्न करुन त्याने गुजरातच्या अहमदाबाद पासपोर्ट कार्यालयातून बोगस दस्तावेज सादर करुन भारतीय पासपोर्ट मिळविल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
राजीवरंजनकुमार राजकुमार यादव हे इमिग्रेशन अधिकारी असून सध्या अॅण्टॉप हिल परिसरात राहतात. गुरुवारी आंतरराष्ट्रीय विमानतळावर ते कामावर हजर झाले होते. यावेळी बांगलादेशला जाणार्या मोहम्मद शमीम याच्या पासपोर्टसह इतर दस्तावेजाची पाहणी करताना त्यांना मोहम्मद शमीम हा गुजरातचा रहिवाशी असल्याचे दिसून आले. त्याच्या भारतीय पासपोर्टवर बांगलादेशचा व्हिसा होता, तो यापूर्वीही अनेकदा बांगलादेशात गेला होता. त्यामुळे त्याला बांगलादेशात जाण्याविषयी तसेच यापूर्वी तो कशासाठी बांगलादेशात गेला होता याबाबत विचारणा करण्यात आली. मात्र त्याला काहीच उत्तर देता आले नाही. त्यामुळे त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान त्याने तो बांगलादेशी नागरिक असल्याची कबुली दिली.
1992 साली त्याने तस्लिमा नावाच्या एका बांगलादेशी महिलेशी लग्न केले होते. त्यानंतर तो बांगलादेशी पासपोर्टवर सिंगापूर येथे नोकरीसाठी गेला होता. तिथे काम करताना तची संगीता चौहाण या महिलेशी ओळख झाली होती. या ओळखीनंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले आणि 1995 साली त्याने संगीतासोबत दुसरा विवाह केला होता. 2002 रोजी तो रोडमार्गे भारतात आला होता. तेव्हापासून तो संगीतासोबत वडोदरा शहरात राहत होता. याच दरम्यान त्याने संगीताच्या मदतीने भारतीय नागरिक असल्याचे बोगस दस्तावेज बनविल होते. या दस्तावेजाच्या मदतीने त्याने अहमदाबाद पासपोर्ट कार्यालयातून अजयभाई दिलीपभाई चौधरी या नावाने भारतीय पासपोर्ट मिळविले होते. याच पासपोर्टवर तो विदेशात गेला होता. तेथून बांगलादेशात गेल्याचे दिसून आले.
हा प्रकार उघडकीस येताच त्याला पुढील चौकशीसाठी सहार पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. याप्रकरणी राजीवरंजनकुमार यादव यांच्या तक्रारीवरुन त्याच्याविरुद्ध बोगस दस्तावेज सादर करुन भारतीय पासपोर्ट मिळविणे, शासनाची फसवणुक करणे, बोगस भारतीय पासपोर्ट विदेशात प्रवास केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.