अंधेरी येथे भीक मागणार्या बांगलदेशी तृतीयपंथीला अटक
भिकार्यांची चांगली कमाई होत असल्याने मुंबईत आल्याची कबुली
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
24 जुलै 2025
मुंबई, – अंधेरी परिसरात भीक मागणार्या एका बांगलादेशी तृतीयपंथीला एमआयडीसी पोलिसांच्या एटीएस पथकाने अटक केली. मोहम्मद अमीरुल इस्लाम युसूफ अली असे या 30 वर्षीय तृतीयपंथीचे नाव असून भिकार्यांची चांगली कमाई होत असल्याने तो सहा महिन्यांपूर्वी बांगलादेशातून मुंबईत आला होता असे तपासात उघडकीस आले आहे. अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.
अंधेरी परिसरात काही बांगलादेशी कामासाठी येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर एटीएसचे पोलीस उपनिरीक्षक जगताप, खांगळ, पोलीस हवालदार इटकर, मंडले, महिला शिपाई बोंद्रे यांनी जिजामाता रोड, पंपहाऊस परिसरात साध्या वेशात पाळत ठेवली होती. घटनास्थळी पोलिसांना एक तृतीयपंथी रस्त्यावरुन येणार्या-जाणार्या लोकांकडून भीक मागत असल्याचे दिसून आले. त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच्याकडे भारतीय नागरिक असल्याचे कुठलेही पुरावे सापडले नाही. त्याच्या बोली भाषेवरुन तो बांगलादेशी नागरिक असल्याचा पोलिसांना संशय आला होता. त्यामुळे त्याची कसून चौकशी करण्यात आली.
चौकशीत त्याने तो बांगलादेशी नागरिक असल्याची कबुली दिली. बांगलादेशातील गरीबी आणि उपासमारीला कंटाळून तो सहा महिन्यांपूर्वीच बांगलादेशातून मुंबईत पळून आला होता. मुंबईत भिकार्यांची संख्या अधिक आहे. या भिकार्यांची दिवसभरात चांगली कमाई होत असल्याने त्यांनी भीक मागण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे तो अंधेरी परिसरात भीक मागण्याचे काम करत होता. दिवसभर भीक मागून तो सायंकाळी त्याच्या नायगाव येथील घरी जात होता.
नायगाव येथील गौरवपाड्यात त्याने एक घर भाड्याने घेतले होते. त्याच्याकडून पोलिसांनी एक मोबाईल जप्त केला आहे. या मोबाईलवरुन तो त्याच्या बांगलादेशातील कुटुंबियासह नातेवाईक आणि मित्रांच्या संपर्कात असल्याचे उघडकीस आले. तपासात आलेल्या या माहितीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्हयांत अटक केल्यानंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.