मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
25 फेब्रुवारी 2025
मुंबई, – शहरात अवैधपणे राहणाऱ्या बांगलादेशी पती पत्नीला बोरिवली पोलिसांनी अटक केली. इरासुल शेख आणि प्रिया शेख अशी त्या दोघांची नावे आहेत. इरासुल हा मेंढपाळांच्या वेशात सीमा ओलांडून भारतात आला होता. त्या दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले होते.
बोरिवली परिसरात काही बांगलादेशी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. वरिष्ठ निरीक्षक मालोजी शिंदे याच्या पथकातील पोलीस निरीक्षक प्रदीप काळे, सहायक निरीक्षक प्रमोद निंबाळकर आदीच्या पथकाने तपास सुरु केला. शनिवारी पोलिसांनी बोरिवली मार्केट येथून इरासुल शेख आणि त्याची पत्नी प्रिया शेखला ताब्यात घेतले. त्या दोघांची कसून चौकशी केली. हे जोडपे नालासोपारा येथे भाड्याने राहत होते. २०१२ मध्ये इरासूल तर २०१६ मध्ये प्रिया ही हिंदुस्थानात आली. शेख हा भंगारचा व्यवसाय करू लागला. मुंबई आणि पालघर येथे तो भंगार साहित्य खरेदी करू लागले. पोलिसांनी त्याच्याकडून आधारकार्ड आणि पॅनकार्ड जप्त केले आहे.
इरासुल हा मेंढपाळच्या वेशात हिंदुस्थानात आला. त्याच्या पत्नीचे अनेक नातेवाईक कोलकाता येथे राहतात. हिंदुस्थान आणि बांगलादेश ची सीमा ओलांडणयासाठी त्याने मेंढपाळाचा वेष धारण केला. मुंबईत आल्यावर शेख आणि त्याच्या मेहुण्याने भंगारचा व्यवसाय सुरु केला. भंगारच्या व्यवसायात त्याला जास्त पैसे मिळत होते. तो पैसे पत्नीच्या नातेवाईकाच्या मार्फत मुलांच्या शिक्षणासाठी बांगलादेशला पाठवत होता अशी माहिती तपासात समोर आली आहे.