मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
28 फेब्रुवारी 2025
मुंबई, – बांगलादेशातील बेरोजगारीसह गरीबीला कंटाळून भारतात आल्यानंतर मुंबई शहरात अनधिकृतपणे वास्तव्यास असलेल्या एका महिलेसह नऊ बांगलादेशी नागरिकांना दोन वेगवेगळ्या कारवाईत शिवाजीनगर आणि काळाचौकी पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. हुसैन मोफिजुल शेख, लिटोन मोफीजुल शेख, अन्सारअली सरदार, सुलेमान रहिम शेख, मोहम्मद सलाम सरदार ऊर्फ बांगलादेशी नाव आबू सलाम, सोहाग सफिकुल सरदार ऊर्फ मोहम्मद सोहाग सफिकुल इस्लाम, मोहम्मद शमीम मुराद हसन अली ऊर्फ समीम मुल्ला, मोहम्मद आलमिन लतिफ मोरोल आणि आशुरा खातून अशी या नऊजणांची नावे आहेत. याच गुन्ह्यांत ते सर्वजण सध्या न्यायालयीन कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
चिंचपोकळी परिसरात काही बांगलादेशी नागरिक वास्तव्यास असून विविध ठिकाणी मिळेल ते काम करत असल्याची माहिती काळाचौकी पोलिसांना मिळाली होती. या माहितीची अतिरिक्त पोलीस आयुक्त अनिल पारसकर, पोलीस उपायुक्त रागसुधा आर, सहाय्यक पोलीस आयुक्त धनश्याम पलंगे यांनी गंभीर दखल घेत काळाचौकी पोलिसांना चौकशीचे आदेश दिले होते. या आदेशानंतर काळाचौकी पोलीस ठाण्याच्या एटीएसचे पोलीस उपनिरीक्षक धनंजय व्यवहारे, अविनाश ढेरे, पोलीस हवालदार ठोके व अन्य पोलीस पथकाने या बांगलादेशी नागरिकांचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असतानाच आशुरा खातून या महिलेस पोलिसांनी ताब्यात घेतले होते. चौकशीत तिने ती बांगलादेशी नागरिक असल्याची कबुली दिली होती. तिच्या चौकशीतून इतर चार बांगलादेशी नागरिकांचे नाव समोर आले होते. त्यानंतर पोलिसांनी वेगवेगळ्या परिसरात वास्तव्यास असलेल्या मोहम्मद सलाम, सोहाग सरदार, मोहम्मद शमीम आणि मोहम्मद आलमिन या चार बांगलादेशी नागरिकांना अटक केली.
दुसर्या कारवाईत शिवाजीनगर पोलिसांनी चार बांगलादेशी नागरिकांना गोवंडी परिसरातून अटक केली. गोवंडीतील शिवाजीनगर, लोटस जंक्शन सिग्नल, बुरानपुर जिलेबी दुकानासमोर काही बांगलादेशी नागरिक नोकरीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापूराव देशमुख यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक विक्रांत शिंदे, पोलीस हवालदार निकम, पोलीस शिपाई पाटील, झोरे, शिंदे यांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवून हुसैन, लिटोन, अन्सार आणि सुलेमान या चौघांना अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी नऊ मोबाईल जप्त केले आहे. या मोबाईलवरुन ते त्यांच्या बांगलादेशी नागरिकांच्या संपर्कात होते. बांगलादेशातील गरीबीसह बेरोजगारीला कंटाळून ते भारतात आले होते. गेल्या काही वर्षांपासून ते सर्वजण मुंबई शहरात वास्तव्यास होते. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर या सर्वांना त्यांच्या मायदेशात पाठविण्यात येणार आहे.