तीन कारवाईत महिलेसह तीन बांगलादेशी नागरिकांना अटक
ग्रँटरोड, अंधेरी व मालाड येथे स्थानिक पोलिसांची कारवाई
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
११ एप्रिल २०२४
मुंबई, – तीन विविध कारवाईत एका महिलेसह तीन बांगलादेशी नागरिकांना डी. बी मार्ग, मालवणी आणि डी. एन नगर पोलिसांनी अटक केली. जुली नजरुल इस्लाम मंडल ऊर्फ प्रियांका, सैफुलदिन मोहम्मद खान ऊर्फ सैफुल इस्लामदिन मोहम्मद आणि सैफुल सलीम मुल्ला अशी या तिघांची नावे असून यातील सैफुल हा गेल्या तेरा वर्षांपासून भारतात वास्तव्यास असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अटकेनंतर या तिघांनाही लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.
मुंबई शहरात अनधिकृतपणे वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी नागरिकांविरुद्ध स्थानिक पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असताना अंधेरीतील जुहू गल्ली, ताश्कंद बेकरीजवळ काही बांगलादेशी नागरिक येणार असल्याची माहिती डी. एन नगर पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर एटीएसचे पोलीस उपनिरीक्षक काळबांडे, पोलीस हवालदार गडहिरे, पोलीस शिपाई चव्हाण यांनी तिथे साध्या वेशात पाळत् ठेवून सैफुलदिन खानला ताब्यात घेतले. तपासात तो बांगलादेशी नागरिक असल्याचे उघडकीस आले. काही महिन्यांपूर्वीच तो बांगलादेशातून मुंबईत नोकरीसाठी आला होता. सध्या तो वेल्डींगचे काम करत होता. दुसर्या कारवाईत डी. बी मार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पंकज शेवाळे, पचलोरे, पोलीस हवालदार चव्हाण, पोलीस शिपाई नगारजी, पाटील, कोयंडे, कापसे, महिला पोलीस शिपाई पानडगळे यांनी ग्रँटरोड रेल्वे स्थानकातून जुली मंडल ऊर्फ प्रियांका या २६ वर्षांच्या महिलेसह अटक केली. जुली ही माहीम येथे राहत असून तिथेच घरकाम करते. तिच्याकडे पोलिसांना २५ हजाराचा एक मोबाईल आणि एक आधारकार्ड सापडला. या आधारकार्डवर मिरा-भाईंदरचा पत्ता आहे. चौकशीदरम्यान ती बांगलादेशी नागरिक असल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर गुन्हा दाखल करुन तिला पोलिसांनी अटक केली. तिला एका महिलेने पैसे देऊन बॉर्डर क्रॉस करण्यास मदत केल्याचे सांगितले.
तिसर्या कारवाईत मालाडच्या मालवणी परिसरातून मालवणी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निररीक्षक शिवशंकर भोसले, पोलीस हवालदार पवार, पोलीस शिपाई जाधव, भामरे यांनी सैफुल मुल्ला या २२ वर्षांच्या तरुणाला अटक केली. सैफुल हा तेथील लक्ष्मीनगरात राहतो. २०११ साली तो बांगलादेशातून भारतात आला होता. तेव्हापासून तो तेरा वर्षांपासून भारतात वास्तव्यास आहे. कोलकाता, नागपूर आणि नंतर तो मुंबईत आला होता. त्याचा भाऊ सरीफुल सलीम मुल्ला याला दिड वर्षांपूर्वी भारतात येत असताना बॉर्डरवर अटक करणत आली होती. तो सध्या कोलकाताच्या डमडम सेंट्रल जेलमध्ये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या तिघांकडून पोलिसांनी तीन मोबाईल जप्त केले आहेत. या मोबाईलची पाहणी केल्यानंतर ते तिघेही त्यांच्या बांगलादेशातील कुटुंबियांच्या नियमित संपर्कात असल्याचे उघडकीस आले आहे. बांगलादेशातील बेरोजगारीसह उपासमारीला कंटाळून ते नोकरीसाठी भारतात पळून आले होते.