नैरोबी येथून प्रत्यार्पण केलेल्या दोन बांगलादेशी नागरिकांना अटक
बोगस भारतीय पासपोर्टवर आबूधाबी-नैरोबी येथे गेल्याचे तपासात उघड
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१८ फेब्रुवारी २०२४
मुंबई, – नैरोबी येथून प्रत्यार्पण केलेल्या एका महिलेसह दोन बांगलादेशी नागरिकांना शनिवारी सहार पोलिसांनी अटक केली. मॉरीशसला जाण्याच्या तयारीत असलेल्या या दोघांनाही ताब्यात घेतल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या इमिग्रेशन अधिकार्यांच्या स्वाधीन करण्यात आले. त्यांच्यावर बोगस भारतीय पासपोर्टवर दिल्लीतून आबूधाबी-नैरोबी असा प्रवास केल्याचा आरोप आहे. मोहम्मद सलीम मोहम्मद बोसिरुल्लाह आणि तस्लिमा खातून मोहम्मद जेवेल अशी या दोघांची नावे असून अटकेनंतर त्यांना स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
सचिनकुमार चरणसिंग हे अंधेरी येथे राहत असून सध्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमिग्रेशन अधिकारी म्हणून काम करतात. शनिवारी सकाळी ते विविध देशातून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणार्या प्रवाशांच्या इमिग्रेशनची तपासणी करत होते. याच दरम्यान नैरोबी येथून डिपोर्ट करुन मुंबईत आणलेल्या दोन प्रवाशांना केनिया एअरलाईन्सच्या कर्मचार्यांनी इमिग्रेशन अधिकार्यांच्या स्वाधीन केले होते. या दोन्ही प्रवाशांची चौकशी केल्यानंतर त्यांची नावे मोहम्मद असलीम आणि तस्लिमा खातून असल्याचे उघडकीस आले. ते दोघेही बांगलादेशी नागरिक होते. त्यांच्या मोबाईलमध्ये ते दोघेही बांगलादेशी नागरिक असल्याचे काही दस्तावेज सापडले. चौकशीदरम्यान त्यांनी भारतात अनधिकृतपणे प्रवेश केल्यानंतर २०२३ साली काही एजंटच्या मदतीने कोलकाता पासपोर्ट कार्यालयातून बोगस भारतीय पासपोर्ट मिळविले होते.
डिसेंबर २०२३ रोजी याच पासपोर्टवरुन ते दोघेही दिल्ली विमानतळावरुन आबूधाबी येथे गेले. १४ फेब्रुवारीपर्यंत ते दोघेही आबूधाबी येथे वास्तव्यास होते. त्यानंतर ते दोघेही नैरोबी येथे गेले होते. तेथून त्यांना मॉरीशसला जायचे होते, मात्र नैरोबी इमिग्रेशन अधिकार्यांना त्यांच्या पासपोर्टबाबत शंका आली. त्यामुळे त्यांना मॉरीशसला जाण्यास मनाई करुन चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडील पासपोर्ट बोगस असल्याचे उघडकीस येताच त्यांना डिपोर्ट करुन मुंबईत पाठविण्यात आले. पासपोर्ट मिळविताना त्यांनी बोगस दस्तावेज सादर करुन चुकीची माहिती दिली होती. याच पासपोर्टवर पासपोर्टवर त्यांनी दिल्ली-आबूधाबी आणि नंतर नैरोबी असा प्रवाश केला होता.
अशा प्रकारे त्यांनी भारतीय पासपोर्ट अधिकार्यांसह इमिग्रेेशन अधिकार्यांची फसवणुक केली होती. त्यामुळे या दोघांनाही पुढील चौकशीसाठी सहार पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले होते. याप्रकरणी सचिनकुमार यांच्या तक्रारीवरुन त्यांच्याविरुद्ध फसवणुकीसह भादवीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच दोन्ही बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या दोघांनाही वांद्रे येथील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.