चार कारवाईत महिलेसह पाच बांगलादेशी नागरिकांना अटक

मुंबईसह इतर ठिकाणी बांगलादेशी वास्तव्यास असल्याचे उघड

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१६ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – मुंबई शहरात अनधिकृतपणे वास्तव्यास असलेल्या एका महिलेसह पाच बांगलादेशी नागरिकांना स्थानिक पोलिसांनी अटक केली. ग्रँटरोड, घाटकोपर, मालाड आणि चेंबूर परिसरात स्थानिक पोलिसांनी ही कारवाई केली. अटकेनंतर या पाचजणांना लोकल कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यातील काही बांगलादेशी गेल्या दोन ते तीन वर्षांपासून मुंबई शहरात राहत असून त्यांचे काही नातेवाईक मुंबईसह ठाणे आणि ठाणे ग्रामीण परिसरात वास्तव्यास असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.

तीन दिवसांपूर्वी डी. बी मार्ग पोलीस ठाण्याचे एटीएसचे पोलीस उपनिरीक्षक पंकज शेवाळे, पोलीस शिपाई नगरजी, कापसे, महिला पोलीस शिपाई बिचकुले आदी पथक गिरगाव परिसरात गस्त घालत होते. यावेळी केळकर स्ट्रिट परिसरात पोलिसांना एक महिला संशयास्पदरीत्या फिरताना दिसली. त्यामुळे तिला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. चौकशीदरम्यान तिने ती बांगलादेशी नागरिक असल्याचे उघडकीस आले. ती सध्या ग्रँटरोड येथील पाववाला पथ, दयानंद इमारतीमध्ये राहत असून काही वर्षांपूर्वी ती बांगलदेशातून मुंबईत आली होती. या कबुलीनंतर तिला पोलिसांनी अटक केली.

दुसर्‍या कारवाईत घाटकोपर पोलिसांनी दोन बांगलदेशी नागरिकांना अटक केली. मोहम्मद आसिफ बाबुल खान आणि तौहिद वैदल हक अशी या दोघांची नावे आहेत. घाटकोपरच्या जे. पी रोडवरील बस डेपोजवळ ते दोघेही आले होते. या बांगलादेशी नागरिकांची माहिती प्राप्त होताच एटीएसचे पोलीस उपनिरीक्षक शिनगरे, पोलीस हवालदार भुजबळ, काटे, सातपुते, ठाकूर यांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवून या दोघांना अटक केली. चौकशीत ते दोघेही दोन वर्षांपूर्वी बांगलादेशातून भारतात आले होते. गेल्या काही महिन्यांपासून ते दोघेही मुंबई शहरात वास्तव्यास होते. त्यांचे अनेक नातेवाईक मुंबईसह नवी मुंबईतील पनवेल, ठाण्यातील भिवंडी, कल्याण आणि ठाणे ग्रामीणच्या मिरारोड-भाईंदर परिसरात राहत असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली. या माहितीनंतर या बांगलादेशी नागरिकांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

मालाड येथील तिसर्‍या कारवाई बच्चू समशेद शेख या बांगलादेशी नागरिकाला कुरार पोलिसांनी अटक केली. बच्चू हा मालाड येथे राहत असून नवीन इमारतीच्या बांधकाम साईटवर काम करतो. तो मालाड परिसरात कामानिमित्त आला होता, याबाबतची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक मेदगे, पोलीस शिपाई पवार, कांबळे यांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने तो बांगलादेशी नागरिक असल्याची कबुली दिली. २०१३ साली त्याला मिरारोड पोलिसांनी अटक केली होती. अडीच वर्ष कारागृहात राहिल्यानंतर त्याला बांगलादेशात पाठविण्यात आले होते. त्यानंतर तो दोन वर्षांपूर्वी बांगलादेशातून पुन्हा भारतात आला होता. कोलकाता येथे काही महिने राहिल्यानंतर तो नोकरीसाठी मुंबईत आला होता असे तपासात उघडकीस आले.

चेंबूर येथील अन्य एका कारवाईत आरसीएफ पोलिसांनी रियाउल्ला रमजान शेख या ४१ वर्षांच्या बांगलादेशी नागरिकाला अटक केली. तो रे रोड येथील फुटपाथवर राहत असून मिळेल ते काम करत होात. गेल्या तीन वर्षांपासून तो मुंबई शहरात अनधिकृतपणे वास्तव्यास होता. गरीबीसह बेरोजगारीला कंटाळून ते सर्वजण बांगलादेशातून भारतात नोकरीसाठी भारतात आल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या पाचही बांगलादेशी नागरिकांकडून पोलिसांनी पाच मोबाईलसह बांगलादेशी चलन हस्तगत केले आहेत. अटकेनंतर या सर्वांना लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन या सर्वांना त्यांच्या देशात पाठविले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page