मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – पार्क केलेल्या कारच्या काचा फोडून आतील बॅगेसह लॅपटॉप चोरी करणार्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला ाबांगुरनगर पोलिसांनी अटक केली आहे. अदनान बशीर कर्वेकर ऊर्फ सिराज ऊर्फ खेकडा असे या २६ वर्षीय आरोपीचे नाव असून तो मालाडच्या मालवणीतील रहिवाशी आहे. त्याच्या अटकेने बांगुरनगर आणि एल. टी मार्ग पोलीस ठाण्यातील पाच गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याच्याकडून पोलिसांनी चोरीचा काही मुद्देमाल हस्तगत केला आहे.
प्रतिक सुरेश अग्रवाल हे हॉटेल व्यावसायिक असून मालाडच्या रेहजा टिपको हाईट्स अपार्टमेंटमध्ये राहतात. २४ ऑक्टोंबरला सायंकाळी ते चिंचोली बसस्टॉपजवळील ऍक्सिस बँक एटीएमसमोर आले होते. तिथे त्यांची कार पार्क करुन ते कामासाठी गेले होते. काही वेळानंतर ते त्यांच्या कारजवळ आले होते. यावेळी त्यांना कारची काच फुटलेली तसेच कारमधील त्यांची बॅग कोणीतरी चोरी करुन पलायन केल्याचे दिसून आले. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी बांगुरनगर पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल ठाकरे यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय सरोळकर, पोलीस हवालदार भोसले, शेलार, राठोड, पोलीस शिपाई पाटील, दळवी यांनी तपास सुरु केला होता. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन या पथकाने अदनान कर्वेकर याला मालवणीतून ताब्यात घेतले.
चौकशीत त्यानेच हा गुन्हा केल्याची कबुली दिली. रस्त्यावर पार्क केलेल्या कारच्या काचा फोडून आतील सामान चोरी करणारा अदनान हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध बांगुरनगर, मालाड, पाल्हेर, कांदिवली पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. अलीकडेच त्याने बांगुरनगर आणि एल. टी मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाच गुन्हे केल्याची कबुली दिली. त्याच्या अटकेने पाच गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याच्याकडून पोलिसांनी हॉटेलची चावी, चेक बुक, घड्याळ, क्रेडिट कार्ड, लॅपटॉप, टँब, एटीएम कार्ड आणि गुन्ह्यांतील एक बाईक पोलिसांनी जप्त केली आहे. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.