हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यांतील वॉण्टेड आरोपीस अटक
क्रिकेटच्या वादातून दोन बंधूंवर हल्ला करुन वर्षभर फरार होता
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१९ जानेवारी २०२५
मुंबई, – हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यांतील एका वॉण्टेड आरोपीस एक वर्षांनी बांगुरनगर पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. मोहम्मद हाशिब ऊर्फ पप्पू लतिफ रैनी असे या ३० वर्षीय आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. क्रिकेटच्या वादातून मोहम्मद हाशिबने दोन बंधूंवर बॅटने प्राणघातक हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर तो पळून गेला होता आणि अखेर एक वर्षांनी त्याला गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे.
दिनेश मारुती पाचकळे हा मालाडच्या दालमिया कॉलेज, सुंदरनगरचा रहिवाशी आहे. तो एका खाजगी कंपनीत, त्याचे वडिल हॉटेलमध्ये कुक तर लहान भाऊ चंद्रशेखर हा बांधकाम साईटवर सुपरवायझर म्हणून काम करतो. रविवारी सुट्टी असल्याने दिनेश हा नेहमी क्रिकेट खेळण्यासाठी शंकरवाडीतील लक्ष्मी पार्कमध्ये जात होता. २२ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी साडेचार वाजता तो त्याचा भाऊ चंद्रशेखर, मित्र संतोष होडे, मेहेंद्र पाटील, तुषार पांचाळ, उमेश काळे व इतर तीन ते चार मित्र किक्रेट मॅच खेळण्यासाठी गेले होते. सायंकाळी पाच वाजता तिथे दुसरी टिम क्रिकेट खेळत असल्याने ते दुसर्या बाजूला क्रिकेट खेळत होते.
यावेळी त्यांच्या पिचवर एक तरुण येत असल्याने त्याने त्याला बाजूला होण्यास सांगितले. मात्र त्याने बाजूला होण्यास नकार दिला होता. त्यावरुन त्यांच्यात वाद झाला होता. यावेळी चंद्रशेखरने त्यांच्यातील वाद मिटविण्याचा प्रयत्न केला असता या टिममधील तिघांनी दिनेश आणि चंद्रशेखर यांच्यावर क्रिकेटच्या बॅटने प्राणघातक हल्ला केला होता. त्यात ते दोघेही जखमी झाले होते. त्यामुळे या दोघांनाही त्यांच्या मित्रांनी जवळच्या पार्वतीबाई चव्हाण (साई क्लिनिक) हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते.
दिनेशच्या डोक्याला, छातीला दुखापत गंभीर असल्याने त्याला तिथे उपचारासाठी दाखल करण्यात आले तर चंद्रशेखरला प्राथमिक औषधोपचारानंतर सोडून देणयात आले. या घटनेची माहिती मिळताच बांगुरनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी दिनेशच्या तक्रारीवरुन पोलिसांनी बॅटने प्राणघातक हल्ला करणार्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध मारामारी, गंभीर दुखापत, हत्येचा प्रयत्नासह शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
याच गुन्ह्यांत मोहम्मद हाशिबचे नाव समोर आले होते, मात्र गुन्हा दाखल होताच तो पळून गेला होता. त्यामुळे त्याचा पोलिसांकडून शोध सुरु होता. ही शोधमोहीम सुरु असताना गेल्या एक वर्षांपासून वॉण्टेड असलेल्या मोहम्मद हाशिबला गोरेगाव येथून शुक्रवारी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला शनिवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का याचा पोलीस तपास करत आहे.