प्रेमसंबंधाच्या संशयावरुन ४९ वर्षांच्या इलेक्ट्रिशियनवर हल्ला
हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यांत पळालेल्या हल्लेखोराला अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२० जानेवारी २०२५
मुंबई, – पत्नीसोबत असलेल्या कथित प्रेमसंबंधाच्या संशयावरुन राजेश जयराम मोहिते या ४९ वर्षीय इलेक्ट्रीशियनवर त्याच्याच परिचित व्यक्तीने लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला केल्याची घटना मालाड परिसरात घडली. डोक्याला गंभीर दुखापत होऊन डोक्याचे हाड फॅक्चर झाल्याने राजेश मोहितेला कूपर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी बांगुरनगर पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या हल्लेखोराला काही तासांत पोलिसांनी अटक केली. बाळकृष्ण असे या ४५ वर्षीय आरोपी हल्लेखोराचे नाव असून अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रेमसंबंधाच्या केवळ संशयावरुन हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले.
राजेश हा वांद्रे येथील चिंचपोकळी रोड, गोसाल्वीसवाडीत राहत असून इलेक्ट्रीशियन म्हणून काम करतो. मालाड येथील क्रिटीकेअर एशिया हॉस्पिटलमध्ये तो सध्या कामाला आहे. रविवारी रात्री सव्वाबारा वाजता तो काम संपल्यानंतर घरी जाण्यासाठी निघाला होता. मालाडच्या लिंक रोड, टोयाटो सिग्नलजवळ आल्यानंतर त्याला बाळकृष्ण भेटला. त्याने त्याच्याशी पत्नीसोबत असलेल्या कथित संबंधावरुन त्याच्याशी वाद घालण्याचा प्रयत्न केला होता. त्यावरुन त्यांच्यात प्रचंड शाब्दिक बाचाबाची झाली होती. त्याच्या रागातून बाळकृष्णने राजेशवर लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला केला होता. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने राजेश हा जागीच कोसळला होता. या घटनेनंतर बाळकृष्ण हा तेथून पळून गेला होता.
ही माहिती स्थानिक लोकांकडून समजताच बांगुरनगर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली होती. रक्तबंबाळ झालेल्या राजेशला पोलिसांनी कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. त्याची प्रकृती प्रकृती गंभीर असल्याने त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून डोक्याचे हाड फॅक्चर झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. जखमी अवस्थेत असलेल्या राजेशची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. या जबानीवरुन पोलिसांनी आरोपी बाळकृष्णविरुद्ध हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना बाळकृष्णला अंधेरी येथून पोलिसांनी अटक केली.
अटकेनंतर त्याला सोमवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस तपासात बाळकृष्ण हा त्याच्या कुटुंबियांसोबत अंधेरीतील मरोळ पाईपलाईन रोड परिसरात राहतो. त्याला त्याच्या पत्नीचे राजेशसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. याच संशयावरुन त्याने राजेशशी वाद घालून त्याच्या डोक्यावर लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.