सफाई करताना पार्टटाईम सफाई कर्मचार्याची बँकेत हातसफाई
खराब नोटा पकिंग करताना कॅशची चोरीप्रकरणी गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२८ जून २०२४
मुंबई, – बँकेत पार्टटाईम सफाई कर्मचारी म्हणून काम करताना एका कर्मचार्याने बँकेतच खराब नोटा पॅकिंग करताना हातसफाई केल्याची घटना उघडकीस आली आहे. या कर्मचार्यावर ३ लाख १८ हजार ५०० रुपयांची कॅश चोरी केल्याचा आरोप असून त्याच्याविरुद्ध वांद्रे पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. हर्षद उदय रावराणे असे या कर्मचार्याचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. सीसीटिव्ही फुटेजमध्ये उघडकीस आलेल्या या घटनेने बँक अधिकारी आणि कर्मचारी वर्गात एकच खळबळ उडाली होती.
गोरेगाव परिसरात राहणारे अरुण रामनारायणप्रसाद वर्मा हे वांद्रे येथील एका खाजगी बँकेत मॅनेजर म्हणून काम करतात. बँकेत जमा होणार्या खराब नोटा स्टेट बँक ऑफ इंडियाला दिले जाते. त्यानंतर स्टेट बँकेतून त्यांना नवीन नोटा दिल्या जातात. त्यांच्या बँकेने १३ जुलै २०१३ रोजी २६० कोटी, ६ सप्टेंबर २० रोजी १५० कोटी, १२ ऑक्टोंबर २०२३ रोजी ८७ कोटी ३० लाख आणि १ नोव्हेंबर २०२३ रोजी ९२ कोटी ८६ लाख रुपयांच्या खराब भारतीय नोटा स्टेट बँकेला पाठविल्या होत्या. त्यानंतर स्टेट बँकेने त्यांच्या बँकेला २ कोटी ९६ हजार ५०० रुपयांच्या नोटा कमी असल्याचा मेल पाठविला होता. त्यामुळे ३१ ऑक्टोंबर ते २ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत बँकेच्या वरिष्ठ अधिकार्यांनी त्यांच्या वांद्रे येथील शाखेत बँकेतील कॅशची तपासणी केली होती. त्यात या अधिकार्यांना काही रक्कम कमी असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे बँकेच्या सर्व कर्मचार्यांची चौकशी करण्यात आली होती.
या चौकशीदरम्यान ३ लाख १८ हजार ५०० रुपयांची कॅश कमी होती. या प्रकाराची वरिष्ठ अधिकार्यांनी गंभीर दखल घेत बँकेतील सीसीटिव्ही फुटेजची पाहणी केली होती. त्यात २७ जुलै ते ११ ऑक्टोंबर २०२३ या कालावधीत बँकेतील पार्टटाईम सफाई कर्मचारी हर्षद रावराणे हा बँकेतील खराब नोटा पॅकिंग करताना त्यातील काही नोटा चोरी करत असल्याचे दिसून आले होते. हा प्रकार लक्षात येताच या अधिकार्यांनी अरुण वर्मा यांना कारवाईचे आदेश दिले होते. चौकशीत हर्षदने ही चोरी केल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे बँकेच्या वतीने अरुण वर्मा यांनी वांद्रे पोलिसांत चोरीची तक्रार केली होती. या तक्रारीनंतर हर्षदविरुद्ध पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.