मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
19 मार्च 2025
मुंबई, – बोगस सोने तारण ठेवून बँकेने दिलेल्या सुमारे 53 लाख रुपयांच्या कर्जाच्या रक्कमेचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी वॉण्टेड असलेल्या एका जोडप्याला मालाड पोलिसांनी दोन वर्षांनी अटक केली. अरविंद हिरालाल दवे आणि विना अरविंद दवे अशी या दोघांची नावे आहेत. याच गुन्ह्यांत सपना भट, मोहम्मद असीम सैफी, सबीना मोहम्मद सैफी, ऑल्वीन अरविंद दवे आणि सोनल एस. श्रंगारपुरे असे पाचजण सहआरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले. या कटात सपना ही मुख्य आरोपी असून तिने इतर बँकेत व्हॅल्यूअर म्हणून काम करताना अशा प्रकारे फसवणुक केले आहे. फसवणुक करणारी ती सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
साविओ मोंटरो हे बोरिवली परिसरात राहत असून ते मॉर्डल सहकारी बँकेत मॅनेजर म्हणून काम करतात. बँकेकडून त्यांच्या ग्राहकांसाठी सोने तारण योजना सुरु करण्यात आली असून त्यासाठी बँकेने सोने व्हॅल्यूअर म्हणून सपना भट हिची नेमणूक केली होती. सोने प्रमाणित करुन त्याची गुणवत्ता तपासणे, सोन्याचे वजन करुन त्याची किंमत निश्चित करणे, सोन्यावर देण्यात येणार्या कर्जाचे प्रमाण निश्चित करणे आदी काम सपना भट हिच्याकडे होती. 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2022 या कालावधीत मालाडच्या बँक शाखेत लॉरेन्स नरोन्हा हे मॅनेजर म्हणून कार्यरत होते. यावेळी सहा अर्जदारांनी सोने तारण योजनेसाठी अर्ज केला होत.
4 एप्रिल ते 21 ऑक्टोंबर 2021 या सहाजणांनी बँकेत सोने तारण ठेवून कर्ज घेतले होते. यावेळी सपना भट हिने बँक व्हॅल्यूअर म्हणून काम पाहिले होते. सोन्याची तपासणी, किंमत निश्चित केल्यानंतर या खातेदारांना बँकेकडून सुमारे 53 लाख रुपयांच्या सोने तारण कर्जाचे वाटप करण्यात आले होते. कर्जाची ही रक्कम सहा खातेदारांच्या नऊ बँक खात्यात जमा झाली होती. मात्र कर्ज घेतल्यानंतर या सहाजणांनी कर्जाचे हप्ते भरले नव्हते. त्यामुळे या सर्वांना बँकेकडून नोटीस बजाविण्यात आली होती. मात्र नोटीस बजावूनही त्यांच्याकडून बँकेला काहीच प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यामुळे बँकेने त्यांच्या सोन्याच्या लिलावाची प्रक्रिया सुरु केली होती.
कर्जाच्या वसुलीसाठी दागिन्यांची फेर मूल्याकंन गरजेचे होते. त्यामुळे बँकेच्या पॅनेलवरील ज्वेलर्स व्यापार्याकडे ते सर्व दागिने तपासणीसाठी दिले होते. या दागिन्यांची तपासणी केल्यानंतर खातेदारांनी सोने तारण कर्जासाठी दिलेले ते सर्व दागिने बोगस असल्याचे उघडकीस आले होते. बोगस दागिने असतानाही सपना भट हिने ते दागिने खरे असल्याचे प्रमाणपत्र देऊन खातेदारांना कर्ज देण्यास सांगून बँकेची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच साविओ मोंटरो यांनी मालाड पोलिसांत तक्रार केली होती.
या तक्रारीची शहानिशा केलनंतर जानेवारी 2023 रोजी सपना भटसह इतर सहाही खातेदाराविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. याच गुन्ह्यांत अरविंद दवे आणि विना दवे हे दोन वर्षांपासून फरार होते, ते दोघेही प्रत्येक वेळेस पोलिसांना गुंगारा देत होते. अखेर दोन वर्षांनी या दोघांनाही अटक करण्यात पोलिसांना यश आले. अटकेनंतर या दोघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यत आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली होती.