सायबर ठगांना बँकेचे किट पुरविणार्या टोळीचा पर्दाफाश
तीन आरोपींना हॉटेलमधून अटक तर इतर आरोपींचा शोध सुरु
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
10 जानेवारी 2026
मुंबई, – एपीके फाईल, ऑनलाईन फसवणुकीसह बेकायदेशीर गेमिंग तसेच बेटींगद्वारे फसवणुक करणार्या सायबर ठगांना विविध नामांकित बँकेचे किट पुरविणार्या एका टोळीचा साकिनाका पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याच गुन्ह्यांत तीन आरोपींना साकिनाका येथील एका हॉटेलमधून पोलिसांनी अटक केली. सिनाजुद्दीन अब्दुल पिलाकल, सुरज दिलीप दवंडे आणि आशिष शिवकुमार पाल अशी या तिघांची नावे आहेत. अटकेनंतर या तिघांनाही लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्या चौकशीतून त्यांच्या इतर काही सहकार्यांची नावे समोर आली आहे. त्यात राजेश बी, अयान ऊर्फ मकसूद शेख ऊर्फ मकसूद, सौरव ऊर्फ आनंद शर्मा ऊर्फ आनंद यांच्यासह इतर आरोपींचा समावेश असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
साकिनाका येथील अंधेरी-घाटकोपर लिंक रोडवर आयकॉन नावाचे एक हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये दोन तरुण त्यांच्या इतर पाच ते सात सहकार्यांच्या मदतीने व्यावसायिक बँक खात्याच्या किटची देवाणघेवाण करत आहेत. या बँक किटचा ऑनलाईन फसवणुकीसाठी वापर होत असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र नांगरे यांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र नांगरे, सागर जाधव, प्रविण पाटील, पोलीस हवालदार किरण कोरे, कदम, शेख आदी पथकाने शुक्रवारी पहाटे चार वाजता हॉटेल आयकॉनच्या रुम क्रमांक 108 मध्ये छापा टाकला होता. यावेळी रुममध्ये असलेल्या सिनाजुद्दीन पिलाकल आणि सुरज दवंडे या दोघांन पोलिसांनी ताब्यात घेतले.
यातील सिनाजुद्दीन हा केरळचाच्या निलांबरचा रहिवाशी असून तो मेडीकल साहित्यांची विक्री करतो तर सुरज हा गोरेगाव येथील आरे कॉलनीतील रहिवाशी असून डिलीव्हरी बॉयचे काम करतो. त्यांच्या चौकशीत त्यांनी त्यांचा केरळ येथील मित्र राजेश बी याने त्याला एका खाजगी बँकेचे किट घेऊन मुंबईत पाठविले होते. त्यात संबंधित बँकेचे डेबीट कार्ड, सिमकार्ड, पासवर्ड आदी होते. सुरजवर वॉचरची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्याला सिनाजुद्दीनवर लक्ष ठेवणे, त्याची जेवणाची सोय करणे, त्याला प्रत्येक कामात मदत करणे आदी काम सोपविण्यात आली होती. त्यासाठी त्याला व त्याचा मित्र आशिष पाल याला अयान आणि सौरव यांच्याकडून प्रत्येकी एक हजार रुपयांचे कमिशन दिले जात होते.
या दोघांकडून पोलिसांनी एक लॅपटॉप, तीन मोबाईल, तीन सिमकार्ड आदी मुद्देमाल जप्त केला आहे. त्यांच्या चौकशीनंतर आशिष पाल याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याच्या चौकशीत त्याला सुरजने केरळ येथून आलेल्या व्यक्तीवर लक्ष ठेवण्यासाठी ऑयनकॉन हॉटेलमध्ये थांबण्यास सांगितले होते. या तिघांना नंतर पोलीस ठाण्यात पुढील चौकशीसाठी आणण्यात आले होते. तपासात ही टोळी एपीके फाईल, ऑनलाईन फसवणुकीसह बेकायदेशीर गेमिंग तसेच बेटींगद्वारे फसवणुक करणार्या काही सायबर ठगांच्या संपर्कात होते. या सायबर ठगांना विविध बँकेत खाती उघडून त्यांना बँक खात्याची माहिती पुरविण्याचे काम करतात.
सिनाजुद्दीनने आताापर्यंत अनेक बँकांचे किट सायबर ठगांना पुरविल्याचे उघडकीस आले आहे. तपासात ही माहिती उघडकीस येताच या सर्व आरोपीविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत सिनाजुद्दीन पिलाकल, सुरज दवंडे आणि आशिष पाल या तिघांना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्यांना लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत राजेश बी, अयान ऊर्फ मकसूद शेख, सौरव शर्मा व इतर आरोपींना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.