फ्लॅटचे बोगस सादर सव्वाकोटीचे कर्ज काढून बँकेची फसवणुक
फसवणुकीप्रकरणी दोन व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
30 मार्च 2025
मुंबई, – फ्लॅटचे बोगस कागदपत्रे सादर करुन बँकेतून काढलेल्या सुमारे सव्वाकोटीचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी दोन व्यावसायिकाविरुद्ध समतानगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आनंदा पोवार आणि सोनाली पोवार अशी या दोघांची नावे आहेत. ते दोघेही पळू गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
राकेश धनाजी मोरे हे बोरिवलीतील एक्सर रोड, त्रिगुन सोसायटीमध्ये राहत असून एका नामांकित बँकेत वरिष्ठ अधिकारी म्हणून कामाला आहे. सध्या ते कांदिवलीतील शाखेत कार्यरत आहेत. त्यांच्याच बँकेत संस्कार अॅग्रो प्रोडक्ट कंपनीचे एक चालू खाते असून या कंपनीची मालक सोनाली पोवार आहे. तीन वर्षापूर्वी तिने बँकेतून व्यावसायिक कर्जासाठी अर्ज केला होता. या अर्जासोबत तिने तिच्या फ्लॅटचे कागदपत्रे तारण म्हणून जोडली होती. या अर्जासह कागदपत्रांची शहानिशा केल्यानंतर तिला बँकेतून एक कोटी वीस लाख रुपयांचे कर्ज मिळाले होते.
कर्ज मिळाल्यानंतर तिने काही हप्ते भरले, मात्र नंतर तिने कर्जाचे हप्ते भरणे बंद केले होते. त्यामुळे तिला बँकेतून नोटीस बजाविण्यात आली होती, मात्र तिने नोटीसला काहीच प्रतिसाद दिला नव्हता. कर्जाची परतफेड करत नसल्याने तिच्या फ्लॅटवर जप्तीची कारवाई बँकेने सुरु केली होती. ही कारवाई सुरु असताना सोनाली पोवारने बँकेत सादर केलेले फ्लॅटचे कागदपत्रे बोगस असल्याचे उघडकीस आले होते. याकामी तिला आनंदा पोवार याने मदत केली होती. अशा प्रकारे फ्लॅटचे बोगस दस्तावेज सादर करुन या दोघांनी बँकेतून कर्ज घेऊन कर्जाची परतफेड न करता बँकेची फसवणुक केली होती.
फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच बँकेच्या वतीने राकेश मोरे यांनी समतानगर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर आनंदा पोवार आणि सोनाली पोवार या दोघांविरुद्ध पोलिसांनी बोगस दस्तावेज सादर करुन एक कोटी वीस लाखांचा अपहार करुन बँकेची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होण्यापूर्वीच ते दोघेही पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.