खारच्या बँक लॉकरमधून सोन्या-चांदीच्या दागिन्यांची चोरी
बँकेचे लॉकरच सुरक्षित नसल्याने खातेदारांमध्ये भीतीचे वातावरण
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
4 जुलै 2025
मुंबई, – खार येथील एका खाजगी बँकेच्या लॉकरमधून अज्ञात व्यक्तीने 8 लाख 81 हजार रुपयांचे विविध सोन्या-चांदीचे दागिने चोरी केल्याने एकच खळबळ उडालली आहे. बँकेचे लॉकरच सुरक्षित नसल्याने बँक खातेदारांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान तक्रारदार महिलेच्या तक्रारीवरुन खार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. बँकेचे सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून या फुटेजच्या मदतीने आरोपीचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही घटना 16 मे 2024 ते 3 जुलै 2025 या कालावधीत खार येथील पाली हिल रोडवर असलेल्या एका खाजगी बँकेत घडली. योजना शिवकुमार आनंद ही महिला खार परिसरात राहत असून तिच्या पतीसोबत तिचे एका खाजगी बँकेत संयुक्त बचत खाते आहे. याच बँकेची त्यांनी लॉकर सुविधा घेतली असून त्यात त्यांनी त्यांच्या घरातील विविध सोन्या-चांदीचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू ठेवल्या आहेत. 16 मे 2024 रोजी त्या बँकेत गेल्या होत्या. यावेळी त्यांनी लॉकर उघडून आतील सर्व दागिन्यांची पाहणी केली होती. त्यानंतर त्या बँकेत गेल्या नव्हता.
3 जुलैला सकाळी दहा वाजता त्या काही कामानिमित्त बँकेत गेल्या होत्या. यावेळी त्यांनी लॉकरची पाहणी केली असता त्यात विविध सोन्या-चांदीचे दागिने व इतर वस्तू असा 8 लाख 81 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे तिच्या निदर्शनास आले. त्यामुळे तिने बँकेच्या मॅनेजरकडे विचारणा केली होती. मात्र त्यांच्याकडून काहीही समाधानकारक उत्तर प्राप्त झाले नाही. अज्ञात व्यक्तीने बोगस चावीचा वापर करुन तिच्या बँकेतील लॉकर उघडून आतील लाखो रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने घेऊन पलायन केले होते.
हा प्रकार उघडकीस येताच तिने खार पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अज्ञात व्यक्तीविरुद्ध चोरीची तक्रार केली होती. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत चोरीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. बँकेचे सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून या फुटेजच्या मदतीने आरोपीचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.