मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
23 मार्च 2025
मुंबई, – पदाचा गैरवापर करुन दोन कोटीचा अपहार करुन एका खाजगी बँकेची सुमारे दोन कोटीची फसवणुक केल्याप्रकरणी सागर मोहन मिश्रा या वॉण्टेड बॅक अधिकार्याला अखेर एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. या गुन्ह्यांत सिद्धेश पटनाईक, रुषभ यादव, अजय यादव, श्यामसुंदर चौहाण आणि विकी शिंदे असे पाचजण सहआरोपी असून सिद्धेश या गुन्ह्यांतील मुख्य आरोपी आहे. त्यानेच इतर बँक अधिकार्यांच्या मदतीने बँकेत हा घोटाळा केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अटकेनंतर सागर मिश्राला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्या चौकशीतून इतर आरोपी बँक अधिकार्यांची माहिती जाणून घेण्याचा पोलीस प्रयत्न करत असल्याचे सांगण्यात आले.
सचिन सुरेश राऊत हे अंधेरीतील मधुवन सोसायटीमध्ये राहत असून गेल्या अकरा वर्षांपासून एका खाजगी बॅकेत कामाला आहे. सध्या ते अंधेरीतील एमआयडीसी परिसरातील बँकेत वरिष्ठ अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या बँकेच्या दोन खात्यात फसवणुक झाली होती. बँकेच्या सहा खात्यातील निधी वापरण्याची परवानगी पंधरा कर्मचार्यांना आहे. त्यात युपीआय रिकन्सेलशन रिषभ यादव, सागर मिश्रा, अजय यादव, पार्टनर अक्वायरिंग युनिटचा शामशुंदर चौहाण, युपीआय डिस्प्रुट सिद्धेश पटनाईक आणि विकी शिंदे यांचा समावेश आहे. ते सहाजण बँकेचे कर्मचारी आहेत. 3 एप्रिल 2023 ते 4 नोव्हेंबर 2024 या कालावधीत या सहाजणांनी त्यांच्या पदाचा गैरवापर करुन बँकेच्या 2 कोटी 5 लाख 34 हजार 312 रुपयांचा परस्पर अपहार करुन ही रक्कम त्यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर केली होती.
सिद्धेश पटनाईकने विकी शिंदे याच्या मदतीने ही रक्कम ट्रान्स्फर केली होती. हा प्रकार नंतर सागर मिश्राच्या लक्षात आला होता. त्याने ही माहिती कोणालाही सांगू नये म्हणून त्याने सागरला 29 लाख 35 हजार रुपये दिले होते. त्यानंतर सागरने एक फाईल बनवून प्रोसेससाठी सिद्धेशला देत होता. अशाच प्रकारे सिद्धेशने इतर कर्मचार्यांना हाताशी धरुन हा आर्थिक घोटाळा केला होता. बँक कर्मचार्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करुन पैशांचा अपहार केल्याचे अलीकडेच काही वरिष्ठ अधिकार्यांच्या लक्षात आले होते. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची बँकेकडून चौकशी करण्यात आली होती. त्यात सिद्धेश पटनाईकने इतर पाच कर्मचार्यांच्या मदतीने दोन कोटी पाच कोटीचा परस्पर अपहार करुन बँकेची फसवणुक केल्याचे उघडकीस आले होते.
चौकशी अहवाल वरिष्ठांना सादर केल्यानंतर वरिष्ठांच्या आदेशावरुन सचिन राऊत यांनी एमआयडीसी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची पोलिसांकडून शहानिशा करण्यात आली होती. त्यात तथ्य असल्याचे आढळून येताच सिद्धेश पटनाईक, रुषभ यादव, सागर मिश्रा, अजय यादव, श्यामसुंदर चौहाण आणि विकी शिंदे या सहाजणांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांची वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी गंभीर दखल घेत पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते.
या आदेशानंतर पळून गेलेल्या बॅक अधिकार्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना गेल्या दिड महिन्यांपासून फरार असलेल्या योगेश मिश्राला शनिवारी पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या गुन्ह्यांत इतर बँक अधिकारी फरार असल्याने त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.