खाजगी बँकेचे सर्व्हर आणि ईमेल आयडी हॅक

कांदिवलीतील घटना; सायबर ठगाविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२९ जून २०२४
मुंबई, – शहरातील एका नामांकित बँकेच्या सर्व्हरसह ईमेल हॅक करुन सर्व्हरमधील माहिती डिलीट करुन त्यात मोठ्या प्रमाणात फेरफार झाल्याचा धक्कादायक प्रकार कांदिवली परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी बँकेच्या वतीने आलेल्या तक्रार अर्जानंतर चारकोप पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. या गुन्ह्यांत बँकेच्या आयटी विभागातील माजी सहाय्यकाचा सहभाग असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे त्याची पोलिसांकडून चौकशी होणार असल्याचे सांगण्यात आले.

केतन शरदकुमार मुनी हे कांदिवली परिसरात राहत असून न्यू इंडिया सहकारी बँकेत गेल्या चौदा वर्षांपासून आयटी हेड म्हणून काम करतात. त्यांच्या बँकेची कांदिवलीतील डहाणूकरवाडी एक कार्यालय असून तिथे शंभरहून अधिक कर्मचारी कामाला आहेत. या कार्यालयातून त्यांच्या सर्व बँकेच्या शाखेचे कामकाज चालते. २० जूनला रात्री नऊ वाजता त्यांच्या बँकेच्या मॅनेजर आणि सहाय्यक ब्रॅच मॅनेजर यांच्या ईमेल ग्रुपवर त्यांच्या कंपनीतील बिझनेस इंटलिजस विभागाकडून संपूर्ण बँकेतील पेमेंट स्लीप असलेला मेल आला होता. त्यामुळे त्यांनी संबंधित विभागाचे अमीत माने यांना संपर्क साधला होता, यावेळी त्यांनी कोणालाही पेमेंट स्लीप पाठविला नसल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांनी त्याची शहानिशा सुरु केली होती. यावेळी त्यांना बँकेचा सर्व्हर आणि ईमेल आयडी अज्ञात सायबर ठगांनी हॅक केल्याचे दिसून आले. या ठगांनी सर्व्हरमधील काही माहिती डिलीट केली होती. सर्वांना मेल पाठविणारा आणि सर्व्हरमधून माहिती डिलीट करणारा व्यक्ती एकच असल्याचे उघडकीस आले.

२१ जून ते २५ जून २०२४ या कालावधीत अज्ञात व्यक्तीने पुन्हा बँकेचा सर्व्हर आणि ईमेल हॅक करुन सर्व्हरमधून काही माहिती डिलीट करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र २० जूनला पहिल्यांदा हा प्रकार उघडकीस येताच त्यांच्या आयटी विभागाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात आली होती. त्यामुळे त्याला सर्व्हरवर लॉगिंग करता आले नाही. संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली असता यामागे मनिष मंगेश मारा असल्याचा त्यांना संशय होता. मनिष हा कांदिवलीतील चारकोप परिसरात राहत असून तो त्यांच्या बँकेच्या आयटी विभागात सहाय्यक म्हणून कामाला होता. हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी मनिष मारा याच्याविरुद्ध चारकोप पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीसह आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत लवकरच मनिष मारा याची पोलिसांकडून चौकशी होणार आहे. या गुन्ह्यांत त्याचा सहभाग उघडकीस आल्यास त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page