बँकेने जप्त केलेल्या फ्लॅटच्या विक्रीची बतावणी करुन फसवणुक
मुख्य आरोपीसह पाचजणांना विविध परिसरातून अटक व कोठडी
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
३० जून २०२४
मुंबई, – बॅकेने जप्त केलेले फ्लॅट स्वस्तात देतो असे सांगून अनेकांची फसवणुक करणार्या एका टोळीचा एल. टी मार्ग पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याच गुन्ह्यांत मुख्य आरोपीसह पाचजणांना वेगवेगळ्या परिसरातून पोलिसांनी अटक केली आहे. रविंद्र सिताराम पाटील रविंद्र तुकाराम पाटील, राहुल भट ऊर्फ परवेझ दस्तगीर शेख ऊर्फ पिटर सिक्वेरा, नितीन शर्मा ऊर्फ साहेब हुसैन खुर्शीद आलम शेख ऊर्फ प्रशांत बन्सल, प्रविण मल्हारी ननावरे, हिना इक्बाल चुडेसारा ऊर्फ हिना वसीम देराईया ऊर्फ अलाहिदा शाह ऊर्फ खान अशी या पाचजणांची नावे आहेत. अटकेनंतर या सर्वांना किल्ला कोर्टात हजर करण्यात आले आहे. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत खलील, उबेद उर रेहमान आणि मेहफुज शेख या तिघांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांच्या अटकेसाठी आता विशेष मोहीम हाती घेतली आहे. या टोळीने स्वस्तात फ्लॅटच्या आमिषाने आतापर्यंत पंधराते वीसजणांची कोट्यवधी रुपयांची फसवणुक केल्याचे बोलले जाते. या टोळीविरुद्ध आझाद मैदान पोलीस ठाण्यात अशाच एका गुन्ह्यांची नोंद आहे.
छाया दिनेश प्रजापती ही महिला ट्रॉम्बे येथील अणुशक्तीनगर, बीएआरसी कॉलनीत राहत असून तिचे पती दिनेश प्रजापती बीएआरसीमध्ये कामाला आहे. ओएलएक्सवर स्वस्तात घर विक्रीसाठी उपलब्ध असल्याची तिला माहिती होती. त्यामुळे तिने ओएलएक्सवर घर पाहण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते. याच दरम्यान तिला एक जाहिरात दिसली होती. चिराबाजार येथील जेएसएस रोड, श्याम भवन इमारतीमध्ये एक घर विक्रीसाठी असल्याचे नमूद करताना एक मोबाईल क्रमांक होता. त्यामुळे तिने मोबाईलवर रविंद्र पाटीलला संपर्क साधला होता. यावेळी त्याने ज्या लोकांनी बँकेतून गृहकर्ज घेतले आहेत, त्यांनी कर्जाचा हप्ता भरला नाही अशा लोकांच्या घरावर बँकेने जप्ती आणली असून या जप्त केलेल्या घराची तो विक्री करत असल्याचे सांगितले.त्याने आतापर्यंत अनेकांना बँकेने जप्त केलेल्या घराची स्वस्तात विक्री करुन दिली आहे. त्यामुळे ती तिच्या सासर्यासोबत रविंद्र पाटीलच्या चिराबाजार येथील कार्यालयात गेली होती. तिथे तिला काही घराचे व्हिडीओ दाखवून तिचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. त्यात नवी मुंबईतील जुईनगर, गावदेवी चौकातील ६२ लाखांच्या एका रो हाऊसचा समावेश होता. तिने तोच रो हाऊस खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे त्याने तिच्याकडून दहा टक्के आगाऊ रक्कम, त्याची फी, स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनसाठी १८ लाख २० हजार रुपये घेतले होते. यावेळी त्यांच्यात एक करार झाला होता. त्यात सहा महिन्यांत रो हाऊसचा ताबा मिळेल, ताबा न मिळाल्यास तिला बारा टक्क्यांनी तिची रक्कम परत केले जातील असे नमूद करुन तिला काही धनादेश केले होते. मात्र पेमेंट करुनही तिला रो हाऊसचा ताबा मिळाला नाही. काही दिवसांनी तिला रविंद्र पाटीलने त्याचे कार्यालय बंद केल्याचे दिसून आले. त्याने दिलेले सर्व धनादेश बँकेत न वटता परत आले होते.
चौकशीदरम्यान तिला रविंद्र पाटीलने तिच्यासह इतर पंधरा ते वीसजणांची अशाच प्रकारे फसवणुक केली होती. त्यांच्याकडून पैसे घेऊन त्यांना फ्लॅटचा ताबा दिला नव्हता. त्यासाठी त्यांनी संबंधित लोकांचे एक व्हॉटअप ग्रुप बनविले होते. याबाबत रविंद्र पाटील व त्याच्या इतर सहकार्यांविरुद्ध आझाद मैदान पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. याच गुन्ह्यांत मे २०२२ रोजी त्याला पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत जामिनावर बाहेर आल्यानंतर तो पळून गेला होता. हा प्रकार उघडकीस येताच तिने एल. टी मार्ग पोलिसात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी कटातील मुख्य आरोपी रविंद्र पाटील व त्याचे इतर सहकारी अन्वर, पीटर, भाग्यश्री, समीर शेख, सिया, ऍड प्रशांत बंसल आणि खुशबू दुबे ऊर्फ पांडे या आठजणांविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असतानाच राहुल भट, नितीन शर्मा, प्रविण मल्हारी, हिना खान या चौघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्या चौकशीनंतर शुक्रवारी रविंद्र पाटील पोलिसांनी चिराबाजार येथून अटक केली. अटकेनंतर या पाचही आरोपींना किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली असून त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या गुन्ह्यांत इतर तिघांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. या टोळीने अशा प्रकारे अनेक गुन्हे केले असून त्यांच्याविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. बँकेने जप्त केलेल्या फ्लॅटची विक्री करुन या टोळीने आतापर्यंत कोट्यवधी रुपयांची फसवणुक केल्याचे बोलले जाते.